दोन्ही सभागृहातील सुविधांचा घेतला आढावा : बांधकाम कामगारांशीही संवाद

नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील नवीन संसद भवनाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी नवीन संसदेला भेट देण्यासाठी आले. तेथे तासाभराहून अधिक वेळ घालवून त्यांनी इमारतीची पाहणी केली. यावेळी पंतप्रधानांनी दोन्ही सभागृहात तयार होत असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. तसेच संसदेच्या बांधकामात गुंतलेल्या मजुरांशीही त्यांनी संवाद साधला. पंतप्रधान मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेही उपस्थित होते. सेंट्रल व्हिस्टा री-डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत त्रिकोणी आकाराचे नवीन संसद भवनचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या फिनिशिंगचे काम सुरू आहे.

केंद्र सरकारने 2019 मध्ये सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पामध्ये संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचाही समावेश आहे. डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी त्याची पायाभरणी केली होती. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 20 हजार कोटी रुपये आहे. या प्रकल्पांतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत अनेक इमारतींचा पुनर्विकास आणि बांधकाम करण्यात येत आहे. यामध्ये नवीन संसद भवनाचा समावेश असून त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेसाठी प्रत्येकी एक इमारत आहे. तसेच मंत्रालयीन कार्यालयांसाठी केंद्रीय सचिवालय, पंतप्रधानांचे निवासस्थान, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान आदी इमारतीही समाविष्ट आहेत.









