चिपळूण :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गची पाहणी करण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले 7 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांचा जाहीर झालेला दौरा लक्षात घेतला तर गतवर्षीप्रमाणे यावेळीही महामार्ग पाहणी रात्रीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
गुरुवारी सकाळी 10.30 वाजता रायगड जिल्ह्यातील पळस्पे येथून त्यांच्या महामार्ग पाहणीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता महाड येथील शासकीय विश्रामगृहात महामार्ग आढावा बैठक होऊन सायंकाळी 4 वाजता ते कशेडी बोगद्यासह पॅकेज-3ची पाहणी करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता कशेडी ते परशुराम या पॅकेज-4 ची, तर सायंकाळी 5 वाजता परशुराम-चिपळूण-आरवली, पॅकेज 5 ची पाहणी करणार आहेत. सायंकाळी 5.45 वाजता आरवली ते कांटे पॅकेज-6ची तर सायंकाळी 6.30 कांटे ते हातखंबा पॅकेज 7 व हातखंबा ते रत्नागिरीची पाहणी करत त्यांचे शासकीय विश्रामगृहाकडे आगमन होणार आहे. तर 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता महामार्गसंदर्भात आढावा बैठक, सकाळी 11 वाजता रत्नागिरी ते हातखंबा, सकाळी 11.15 वाजता हातखंबा ते वाकेड या पॅकेज 7 ची पाहणी करत दुपारी 12.15 वाजता ओणी-अणुस्कुरा घाट- कराड मार्गे ते साताराकडे प्रयाण करणार आहेत.
दरम्यान, बांधकाम मंत्री यांच्या या दौऱ्यावर नजर टाकली तर तो गतवर्षीसारखाच दिसत आहे. गतवर्षी चिपळुणात ते सायंकाळी येणार म्हटले आणि रात्री 8 वाजता सरळ निघून गेले. ते येणार म्हणून परशुराम घाटात अधिकाऱ्यांसह अनेकजण थांबले होते. परशुराम घाट हा मुख्य अपघातस्थळ आहे किंवा ज्या ठिकाणी दरडी कोसळतात किंवा संरक्षक नेट फाटले, त्याची पाहणी जर उजेडात झाली तरच ते उचित होऊ शकते. त्यामुळे जर रायगडमध्ये दौऱ्याला उशीर झाला तर पुन्हा काळोखात काय बघणार, असा प्रश्न येथील जनता विचारत आहे.








