कुंभारजुवे/ प्रतिनिधी
गंवडाळी येथील खाडीत बांधत असलेल्या बेकायदेशीर जेटीला स्थानिकांकडून झालेल्या कडाडून विरोधानंतर सदर जेटीची पाहणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी सरकारी अधिकाऱयांसह शनिवारी केली. काही दिवसांपूर्वीच समाजमाध्यमांवरील एका पोस्टमध्ये कुंभारजुवा खाडीमध्ये सिनर्जी शिपबिल्डर्स यांनी बेकायदेशीर भराव घातल्याचा मुद्दा बराच गाजला होता. डॉकची जागा वाढविण्यासाठी कंपनीने ढाचा उभारल्याचेदेखील यामध्ये स्पष्ट दिसत होते. सदर जागेला संबंधित खात्याच्या अधिकाऱयांसहीत भेट देऊन संबंधित बेकायदेशीर बांधकाम त्वरित
हटविण्याचे निर्देश कुंभारजुव्याचे आमदार राजेश फळदेसाई यांनी सदर कंपनीला दिले आहेत. स्थानिक पंचायतीच्या संगनमताने ही जेडी उभारल्याचेदेखील या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. स्थानिक आमदारांनी यामध्ये लक्ष घालावे, असे आवाहनही यामध्ये करण्यात आले होते.
बंदर कप्तान खात्याने सदर कंपनीला निर्देश केले असून 8 ते 10 दिवसांची मुदत कंपनीला सदर ढाचा मोडण्यासाठी देण्यात आल्याचे आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले .
परवानगी घेतलेल्या मर्यादेपेक्षा ही जेडी 6 मीटर अधिक आहे. त्यामुळे मी त्यांना ती मोडण्यासाठी 8-10 दिवसांचा कालावधी दिला आहे. बंदर कप्तान खात्याच्या जेम्स ब्रागांझा यांच्याशी बोलणे झाले असून त्यांना परिस्थितीची कल्पना मी दिली आहे. यानंतर कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. हा ढाचा दिलेल्या वेळेत न हटवल्यास जबरदस्तीने तो मोडण्यात येईल, असे त्यांनी पुढे सागितले. सोशल मीडियावरची दखल घेऊन आमदार राजेश फळदेसाई यांनी सदर बेकायदेशीर बांधकाम त्वरित मोडण्याचे आदेश दिल्याबद्दल त्यांचे या परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.









