शंकरपेठ नजीकच्या पुलाची दुर्दशा : कमकुवत बनल्याने वाहतुकीसाठी धोकादायक, पर्यायी मार्गाचा वापर
वार्ताहर/ जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील शंकरपेठ नजीकच्या मलप्रभा नदीवरील पुलाची देखील दुर्दशा झाली असून हा पूलदेखील वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्याची दखल घेऊन बेळगावचे जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी रविवारी सदर पुलाची पाहणी केली. सध्या जांबोटी-कणपुंबी विभागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मलप्रभा नदीला पूर आला आहे. तसेच सततच्या पावसामुळे या रस्त्यावरून होणाऱ्या वाढत्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यावरील नदी नाल्यावरील पूलदेखील धोकादायक बनली आहेत. सुमारे 60 वर्षांपूर्वी मलप्रभा नदीवर शंकरपेठनजीक पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र सध्या या पुलाची देखील पार दुर्दशा झाली आहे. या नदीला येणाऱ्या सततच्या महापुरामुळे पुराच्या पाण्यातून वाहून येणारे लाकडी ओंडके, बांबूची बेटे व इतर वस्तुंमुळे पुलाच्या बरग्यातून पाणी वाहून जाणाऱ्या कमानी धोकादायक बनल्या आहेत. शिवाय पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता खचला आहे. पुलावर गुडघाभर पाणी साचल्याने हा पूल वाहतुकीला धोकादायक बनला आहे.
वाहतुकीचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
गेल्या चार दिवसापासून बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील कुसमळी नजीकच्या मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कमकुवत बनल्यामुळे वाहतुकीला बंद केला आहे. वाहतूकदार पर्यायी मार्ग म्हणून पिरनवाडी-खानापूर- जांबोटी-गोवा या मार्गाचा अवलंब करीत असल्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत असल्याने हा पूलदेखील धोकादायक बनल्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहमद रोशन हे रविवारी खानापूर तालुका दौऱ्यावर आले असता त्यांनी मलप्रभा नदीवरील शंकरपेठ पुलाची पाहणी करून पुलावरून होणाऱ्या वाढत्या वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याचा आदेशही उपस्थित अधिकारीवर्गांना दिला. यावेळी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागीय मुख्य कार्यकारी अभियंता सोभद्र, खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक, सहाय्यक कार्यकारी अभियंता होनकांडे आदी अधिकारी उपस्थित होते.
खानापूर विद्यानगरात घराची भिंत पडून नुकसान 
खानापूर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक जुन्या घरांच्या भिंती पडण्याचे प्रकार सर्वत्र पाहावयास मिळत आहेत. खानापूर शहरालगत असलेल्या विद्यानगर भागातील गीता पुंडलिक पाटील यांच्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे. घराच्या पाठीमागील भिंत रविवारी रात्री कोसळली. घरातील व्यक्ती समोरच्या खोल्यांतून झोपलेले असल्यामुळे कोणालाही इजा पोहचली नाही. परंतु भिंत कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त महिलेला शासनातर्फे नुकसानभरपाई मिळावी म्हणून मागणी केली जात आहे.









