सेक्टर अधिकाऱ्यांनी घेतली मतदान केंद्रांची माहिती
बेळगाव ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने जोरदार तयारी चालविली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आचारसंहितेच्या नियमावलींचे पालन आणि विविध ठिकाणी चेकपोस्टची उभारणी करून वाहने तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन शांततेत मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. शहर आणि ग्रामीण मतदारसंघातील निवडणुकीसाठी सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासह ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत जागृती मोहीम राबविण्यात येते. तसेच मतदान केंद्रांची चाचपणी केली जात आहे. महापालिका व्याप्तीत अनेक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून ओळखली जातात. याची माहिती घेण्याचे काम सेक्टर अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन त्याठिकाणी असलेल्या सुविधांची माहिती घेत आहेत. मतदान केंद्रांच्या सभोवती असलेल्या परिसराची माहिती घेऊन त्याची नोंद केली जात आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या अप्रिय घटना घडत असतात. अशा घटना घडू नयेत याकरिता खबरदारी घेतली जाते. त्यादृष्टीने सेक्टर अधिकाऱ्यांकडून संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली. तसेच मतदानासाठी येताना नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, शांततेत मतदान करावे, असे आवाहन नागरिकांना केले. तसेच अन्य मतदान केंद्रांवर उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली जात आहे. मतदान केंद्रांच्या खोल्यांच्या खिडकी-दरवाजे तसेच लाईटची सुविधा, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदी सुविधांची माहिती घेतली जात आहे. ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत, त्याठिकाणी पाणी, लाईट आणि रॅम्पची सुविधा उपलब्ध करण्यासह खिडकी-दरवाजांची दुरुस्ती करण्याची सूचना करण्यात येत आहे.









