प्रत्येक कुटुंबातील मजुराला किमान शंभर दिवसांची मजुरी देण्याची सूचना : मजुरांना केले मार्गदर्शन
खानापूर : शासनाची रोहयो योजना योग्य पद्धतीने राबविण्यात यावी, तसेच प्रत्येक कुटुंबातील मजुराला किमान शंभर दिवसांची मजुरी देण्यात यावी, गावच्या विकासासाठी आवश्यक असलेली कामे योग्य पद्धतीने राबवून गावांचा कायापालट करावा आणि रोहगार हमी योजनेतील विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हैसूर येथील भू व जलसंपदा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. प्रमोद एम. चांदकवते यांनी केले. तालुक्यातील रोहयो कामांची तसेच ग्राम पंचायतींच्या विविध उपक्रमांच्या कामांची पाहणी करताना मजुरांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ग्रा. पं. विकास अधिकारी चन्नबसय्या कलमठ, सागरकुमार बिराजदार, ग्रा. पं. अध्यक्षा नमिता देसाई, तांत्रिक समन्वयक विश्वनाथ हट्टीवळी, महांतेश जंगट्टी, शशीधर सत्तेगेरी यासह ग्रा. पं. सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.
कापोली के. जी. ग्राम पंचायत हद्दीतील रोहयो योजनेंतर्गत राबवण्यात आलेल्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली. जंगलातील प्राण्यांपासून गावांचे संरक्षण करण्यासाठी मारण्यात आलेले खंदक तसेच हत्तींना रोखण्यासाठी मारण्यात आलेले मोठे खंदक यांची पाहणी करण्यात आली. तसेच ग्रामस्थांच्या कापोली येथील पाळणाघरालाही त्यांनी भेट देवून बालकांची पाहणी केली. पोषण आहार वितरणाची माहिती घेतली. त्यानंतर नंदगड ग्राम पंचायतीला भेट देवून येथील बापूजी सेवा केंद्र, डिजीटल ग्रंथालय, मनरेगाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या कामांची माहिती घेतली. तसेच विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना आणि ग्रा. पं. सदस्यांना डॉ. चांदकवते यांनी मार्गदर्शन केले.









