सहभागी चित्ररथांची घेतली अधिकाऱयांकडून माहिती : शिवजयंती, बसवजयंती, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवणार
प्रतिनिधी /बेळगाव
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी मंगळवारी सायंकाळी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. दि. 4 मे रोजी होणाऱया शिवजयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी व्यापक तयारी करण्यात येत असून त्या तयारीचा भाग म्हणून आयुक्तांनी प्रमुख मार्गांची पाहणी केली.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व शहरातील इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सायंकाळी राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून पोलीस आयुक्तांनी पाहणी सुरू केली. चालत काकतीवेस, खडेबाजार, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौकासह मिरवणूक मार्गाची पाहणी केली. मिरवणुकीत किती चित्ररथ सहभागी होणार आहेत? कोणत्या विभागातील चित्ररथ कोणत्या मार्गावरून येणार आहेत आदीविषयी आपल्या अधिकाऱयांकडून त्यांनी माहिती घेतली.
शिवजयंती, बसवजयंती, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त करण्यात येत आहे. आयुक्त आणि दोन्ही उपायुक्त बेळगावला नवखे आहेत. दोन वर्षांनंतर चित्ररथ मिरवणूक होत आहे. बेळगावच्या शिवजयंती उत्सव मिरवणुकीला एक वेगळी परंपरा आहे. यंदा मिरवणुकीला गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापासूनच खबरदारी सुरू केली आहे.
शिवजयंती उत्सव मंडळाशी चर्चा
मंगळवारी मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दि. 4 मे रोजी होणारी मिरवणूक व पालखी पूजनासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले. रमजान ईद, बसवजयंती व शिवजयंती हे बेळगावचे वैशिष्टय़पूर्ण उत्सव असून ते शांततेत पार पाडणे प्रत्येक बेळगावकरांचे कर्तव्य आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, मिरवणूक विनाकारण ताटकळत ठेवू नये, हुल्लडबाजीला थारा देऊ नये, अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस दलाकडून लावण्यात आलेल्या जाचक अटींबाबतही पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली. पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. आपल्या अधिकाऱयांशी चर्चा करून मंडळ पदाधिकाऱयांची बैठक घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावेळी दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.









