वाहन पार्किंग, गर्दीच्या ठिकाणची माहिती : यात्राकाळात स्वत: उपस्थित राहणार
वार्ताहर /नंदगड
करंबळ येथे महालक्ष्मी यात्रा दि. 28 फेब्रुवारीपासून गुरुवार दि. 7 मार्चपर्यंत भरणार आहे. या यात्रेत प्रामुख्याने करंबळ, जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल या पाच गावांचा समावेश आहे. या पाच गावातील जनतेसह पै-पाहुणे व दूरवरून बाहेर गावातील लोक मोठ्या प्रमाणात यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. यात्रेला येणाऱ्यांची सुरळीत व्यवस्था व्हावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी बुधवारी बैलहोंगलचे डीएसपी रवि नाईक यांनी करंबळ गावाला भेट दिली. यात्राकाळात गर्दी होणारे दिवसांची माहिती घेतली. यात्रेत स्वत: उपस्थित राहणार असल्याचेही डीएसपी रवी नाईक यांनी सांगितले.
करंबळ येथील यात्रास्थळी लक्ष्मी देवीचा भव्य मंडप व बाजूला भाविकांसाठी विश्रांती स्थळ निर्माण करण्यात आले आहे. यात्रास्थळ गावच्या ईशान्य दिशेला आहे. तर गावच्या नैर्त्रुत्य दिशेला वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी, रविवारी व शेवटच्या दिवशी गुरुवारी खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील सर्व वाहने गोवा क्रॉस, होनकल क्रॉसहून कौंदल क्रॉस मार्गे वळवले जाणार आहे. याबाबतची माहिती यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी डीएसपी नायक यांना दिली. यावेळी संपूर्ण गावभर फिरून पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्याबाबत योग्य ती व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डीएसपी रवि नाईक यांनी सांगितले. शिवाय प्रत्येक गावातून 50 स्वयंसेवक नेमण्यात यावेत, अशी सूचना डीएसपी नायक यांनी ग्रामस्थांना केली. यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक गिरीश होते.
स्वयंसेवकांना ओळखपत्र व विशेष टी-शर्ट देण्यात यावे जेणेकरून त्याचा लाभ पोलिसांना होईल, अशी सूचना ग्रामस्थांकडे पोलीस अधिकाऱ्यांनी केली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी आणि यात्रा कमिटीने एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. लक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सातेरी घाडी, कार्याध्यक्ष महादेव घाडी, उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, खजिनदार जयंत पाटील, सचिव नामदेव गुरव, बुधाप्पा चौगुले आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.









