कराड :
हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत कराड बसस्थानकाची राज्यस्तरीय समितीने पाहणी केली. या समितीने बसस्थानकात केलेल्या स्वच्छतेच्या उपाययोजना, शौचालये, पाण्याची व्यवस्था, बागबगीचा यासह अन्य सोयी-सुविधांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत चांगल्या सोयी-सुविधा निर्माण व्हाव्या, या हेतूने एस. टी प्रशासनाच्या वतीने राज्यभर हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या 2025 मधिल पहिल्या फेरीत कराड बसस्थानकाने पुणे विभागात अ वर्गात तृतीय क्रमांक पटकावला आहे. नुकतेच दुसऱ्या फेरीचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्यस्तरीय समितीने कराड आगाराला भेट देऊन पाहणी केली. या समितीत मुंबई विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापिका यामिनी जोशी, मुंबई विभागाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी संतोष शेगोकर यांचा समावेश होता.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत कराड आगाराने बसस्थानकात चांगले काम केले आहे. बसस्थानकाच्या आवारातील साफसफाई व स्वच्छता गृहाची दैनंदिन स्वच्छता करण्यात येत आहे. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सेल्फी पाँईट, रंगरंगोटी, बसस्थानकातील फुलझाडांच्या कुंड्या आदी प्रकारची अनेक कामे करण्यात आली आहेत. संपुर्ण बसस्थानकाची पाहणी केल्यानंतर समितीने समाधान व्यक्त केले. वरिष्ठ आगार व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ, आगार व्यवस्थापक विक्रम हंडे, आगार लेखाकार प्रकाश भांदिर्गे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल लटके, वाहतूक नियंत्रक अनिल सावंत, वरिष्ठ लिपीक सचिन महाडिक, सुरज पाटील, दीपक महाजन, अमित कोळी, जगन्नाथ शिंदे, माधुरी फणसे, शुभांगी जामदार, सुरेखा साळुंखे, रेश्मा पवार यांच्यासह आगारातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.








