वर्तमान पत्रांतील वृत्तामुळे दखल
काणकोण : काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर, यानी बालभवनचे संचालक दयानंद चावडीकर, केंद्र प्रमुख विठोबा वेळीप यांच्या सहित काणकोणच्या बालभवन इमारतीची पाहणी केली. यावेळी बालभवनचे लेखा प्रमुख लक्ष्मीकांत मणेरीकर, स्थानिक नगरसेवक हेंमत ना. गावकर उपस्थित होते. काणकोणच्या बालभवनची इमारत अत्यंत जुनी अशी इमारत असून या संबधी दै. तरूण भारतने 13 जुलैच्या अंकात या संबधीचे सचित्र वृत्त प्रसारित केले होते. वादळवारा, पाऊस, नारळ पडणे, वानरांच्या उच्छादामुळे इमारतीवरील कौले वारंवार फुटत असतात याची माहिती केंद्र प्रमुख विठोबा वेळीप यानी वारंवार दिली होती. वर्तमानपत्रातूनही त्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेऊन आपण या केंद्राची पहाणी करण्यासाठी आल्याचे संचालक श्री. चावडीकर यानी यावेळी स्पष्ट केले. या संबधी मुख्यमंत्री, बालभवनचे अध्यक्ष यांच्याशी रितसर चर्चा करून इमारतीच्या दुरूस्ती संबधी उपाय योजना करण्यात येणार असल्याचे संचालकांनी यावेळी सांगितले. या इमारती संदर्भात वर्तमानपत्रांतून आलेल्या वृत्ताची दखल घेतानाच या केंद्रात येणाऱ्या मुलांच्या जीवाची काळजी लक्षात घेऊन सभापती रमेश तवडकर यानी या संबधी उपाय योजना करण्यासाठी पाऊले उचलल्याबद्दल स्थानिक नगरसेवक हेंमत ना. गावकर यानी काणकोणच्या आमदारांच्या कर्तव्य तत्परेचे कौतुक केले आहे.









