वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना : जिल्हा रुग्णालय आवारात स्वच्छता मोहीम
बेळगाव : मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरामध्ये आपली पहाटेची भेट कायम ठेवली आहे. सदाशिवनगर येथील महानगरपालिकेच्या वाहनतळाला भेट देऊन कर्मचाऱ्यांचे हजेरी बुक तपासणी करून विविध ठिकाणी भेटी दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन तलावांच्या कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. रविवारी पहाटेच आयुक्त दुडगुंटी यांनी चव्हाट गल्ली येथील बीट कार्यालयाला भेट देऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली. आरोग्य निरीक्षकांना केलेल्या सूचनेनुसार कामे सुरू आहेत की नाही? याची पाहणी करून चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली व जुना पी. बी. रोड येथील कचऱ्याची उचल होत आहे की नाही, याची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. रस्त्याकडेला कचरा साठवणूक करण्यात येऊ नये. तत्काळ तो कचरा उचलण्यात यावा, अशी ताकीद अधिकाऱ्यांना दिली. यानंतर वनखात्याच्या कार्यालयाला भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी करून बसस्थानकाजवळ असणाऱ्या कॉर्पोरेशन कॅम्पसला भेट देऊन पाहणी केली. यानंतर ‘मेरी माटी, मेरा देश’ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महापौर, उपमहापौर व नगरसेवकांच्या उपस्थितीत आयुक्तांनी व मनपा कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. या ठिकाणी साठलेला कचरा स्वच्छ करण्यात आला.
शहरातील विविध भागाला भेटी
शहरातील विविध भागाला भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी केली. रेल्वेस्थानकाला भेट देऊन कपिलेश्वर तलाव, जक्कीनहोंड तलाव या ठिकाणी सुरू असलेली कामे व गणेश विसर्जनादरम्यान राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तरतूद करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली.









