गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : गणेशोत्सवाच्या तयारीला महापालिका लागली असून गणेश विसर्जन तलावांची पाहणी महापौर शोभा सोमणाचे आणि नगरसेवकांनी केली आहे. शहरातील गणेशोत्सव मूर्ती विसर्जन तलावांना भेट दिली. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आहेत. बेळगावचा गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. विसर्जनादिवशी भव्य अशी मिरवणूक काढली जाते. मिरवणूक पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. विसर्जन करताना काही अडथळे निर्माण होत असतात. ते अडथळे होऊ नयेत यासाठी सर्व प्रकारची पाहणी महापौरांनी केली आहे. तलावांची आताच स्वच्छता करावी, तलावांमध्ये विसर्जन करताना क्रेनची आवश्यकता आहे. क्रेन कोणत्या ठिकाणी उभे करायची, त्याचबरोबर अडचणी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कपिलेश्वर तलाव, जक्कीनहोंड तलाव, अनगोळ, वडगाव, जुने बेळगाव या परिसरातील तलावांची पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका वाणी जोशी, इतर नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.









