बेळगाव : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त आपल्या देशातील लोकशाही व संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात 145 किलोमीटरची मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. शुक्रवारी अधिकाऱ्यांनी मानवी साखळीच्या मार्गाची पाहणी केली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदींसह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गाची पाहणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तयारी करण्याची सूचना त्यांनी केली.
या उपक्रमात भाग घेणाऱ्यांची सुरक्षितता व सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याबरोबरच निश्चित वेळेत मानवी साखळी पूर्ण करावी, विद्यार्थी, युवक, संघटना व संस्थांचे प्रतिनिधी व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तर मानवी साखळीसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासह पार्किंगची व्यवस्था करण्याची सूचना पोलीसप्रमुखांनी केली. मानवी साखळीत भाग घेणाऱ्यांना व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी फलक लावण्याची सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली. यरगट्टी, हलकी क्रॉस, इंचल क्रॉस, करडीगुद्दी, सालापूर क्रॉस परिसरात भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळीपासून कित्तूरपर्यंत ही मानवी साखळी होणार आहे. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.









