वार्ताहर/ काकती
काकती शिवारात शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन हिंडाल्को इंडस्ट्रीजच्या अॅसिडमिश्रीत पाण्याने खराब झालेल्या जमिनीची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची नुकतीच पाहणी केली.
येथील नेगीलयोगी सुरक्षा रयत संघाच्यावतीने अॅसिडमिश्रीत पाण्याने शेतजमिनी खराब झाल्याचे आरोप केले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत तालुका तहसीलदार आर. के. कुलकर्णी, उपतहसीलदार सदाशिव साळुंखे, कृषी अधिकारी आर. बी. नायकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जगदीश आदी शिष्टमंडळाने भेट दिली.
यावेळी ग्रामलेखाधिकारी प्रकाश गमाणी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी 2019 साली पुराने नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली काय? असा सवाल केला. नदीकाठच्या जमिनीचे नुकसान झाले होते. त्यांना नुकसानभरपाई देण्यात आल्याचे गमाणी यांनी उत्तर दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कृषीखात्याने या मातीची खासगी चाचणी करावी. हिंडाल्कोच्या घातक रसायनाचा या जमिनीवर परिणाम होऊन खराब झाल्या असतील तर नुकसानभरपाईबाबत विचारविनिमय करता येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित असलेला शेतकरी निंगाप्पा शहापूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, ही जमीन कडक झाली असून जमिनीवर पाय ठेवले तरी बोचते. ओल्या जमिनीत पाय ठेवल्यास तळपायांना खाज पडते. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, हिंडाल्कोच्या घातक रसायनाचा या जमिनीत अंश आहे काय? हे तपासायचे आहे. तयानंतर यावर निर्णय घेऊ, असे सांगितले.









