प्रतिनिधी /काणकोण
खोतीगाव पंचायत क्षेत्रातील नडके येथील भात शेतीत अकस्मात पाणी घुसल्यामुळे या भागातील 11 शेतकऱयांच्या भातशेतीची हानी झाली आहे. अकस्मात आलेल्या पाण्याच्या लाटेबरोबर या ठिकाणी नवीन ओहोळ तयार झाले आहेत. त्याची पाहणी सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, विभागिय कृषी अधिकारी कवीराज ना. गावकर, जलस्त्रोत खात्याचे अभियंता किशोर परवार, मामलेदार कार्यालयातील सर्कल निरीक्षक रोहिदास गावकर यांनी सदर भागाची पाहणी केली आणि ज्या शेतकऱयांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे त्यांची पाहणी करुन अहवाल तयार केला आहे.
सदर प्रकार हा ढगफुटीचाच असून साधारणपणे 9 हजार चौ. मीटर इतक्या भातशेतीची त्यात नुकसानी झाली आहे. कित्येक ठिकाणी मोठ मोठे दगड धोंडे येऊन पडले आहेत. मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झालेला असून आनंद भैरो गावकर, कृष्णा कुसड वेळीप, सुरेश कुसड वेळीप, मोलू लक्ष्मण गावकर, संतोष तोळू गावकर, संदीप नारायण गावकर, जानू माणयो गावकर, अर्जुन राम गावकर या शेतकऱयांच्या शेताची नासाडी झाली आहे.
अकस्मात आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे नवीन ओहाळे या ठिकाणी तयार झालेले आहेत. या सर्व प्रकाराचे निरीक्षण आणि सर्वेक्षण करून आपत्कालिन व्यवस्थापन मंडळामार्फंत या शेतकऱयांना सहकार्य करण्याची तयारी उपजिल्हाधिकारी, मामलेदार तसेच कृषी कार्यालयाने ठेवली आहे.









