नोंदीपेक्षा शेततळी कमी असल्याचे निदर्शनास : तळ्याभोवती तारेचे कुंपण घालण्याची सूचना
बेळगाव : कृषी खाते आणि फलोत्पादन खात्याकडे नोंद असलेल्या शेततळ्यांपैकी प्रत्यक्षात तलावांच्या संख्येत तफावत असल्याने जिल्ह्यातील शेततळ्यांना भेटी देऊन अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे. सध्या जे तलाव अस्तित्वात आहेत, त्यांच्याभोवती तारेचे कुंपण घालण्याची सूचना शेतकऱ्यांना केली जात आहे. जिल्ह्यात 2014 ते 2024 या काळात कृषी आणि फलोत्पादन खाते, त्याचबरोबर ग्राम पंचायतीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेंतर्गत अंदाजे 30 हजार शेततळी खोदण्यात आली होती. त्याचबरोबर कृषी आणि फलोत्पादन खात्यामार्फत 2023 ते 2025 दरम्यान 1800 शेततळी खोदण्यात आली आहेत. मात्र, खात्याकडे कागदोपत्री नोंद असलेल्या तलावांची प्रत्यक्षात पाहणी केली असता संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.
खबरदारी म्हणून तारेचे कुंपण घाला
अलीकडे शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळी निर्माण केली आहेत, त्यांना खबरदारी म्हणून त्याभोवती तारेचे कुंपण घालण्याची सूचना अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्याचबरोबर अधिकारी स्वत: भेट देऊन पाहणी करत आहेत. जिल्ह्यातील गोकाक, मुडलगी, सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, रायबाग, खानापूर, कागवाड, निपाणी, बैलहोंगलसह विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी निर्माण करण्यात आली आहेत.
उन्हाळ्यात पाणी समस्या भासू नये यासाठी तलाव निर्मिती
उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भासू नये यासाठी या तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानदेखील दिले जाते. रोहयो योजनेंतर्गतही तलावांची खोदाई केली जात आहे. त्यामुळे सदर कृषी तलाव शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहेत. जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत, अशा बहुतांश शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. मात्र, जे शेतकरी एजंटांमार्फत अर्ज करत आहेत, त्यांना याचा लाभ मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. कृषीभाग्य योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततलाव उपलब्ध करून दिले जात आहेत. रोहयो योजनेंतर्गत शेततळे बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते. तसेच डिझेल किंवा सोलार पंपसेटसाठी शासनाकडून अनुदान देण्यासह वीजजोडणी करण्यासाठीही अनेक योजना सरकारने आखल्या आहेत. गोकाक, रायबाग तालुक्यांमध्ये जेसीबीच्या साहाय्याने 7 हजारहून अधिक शेततळी बांधण्यात आली आहेत.
पाहणी काम प्रगतीपथावर…
फलोत्पादन खात्याच्या अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या शेततळ्यांची पाहणी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शेततळ्याभोवती तारेचे कुंपण घालण्याची सूचना शेतकऱ्यांना केली जात आहे.
– महांतेश मुरगोड, उपसंचालक फलोत्पादन खाते









