बेळगाव : पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडे हटविण्यात यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच महापौर मंगेश पवार यांनी शहराचा दौरा करण्यास सुरुवात केली. भाग्यनगर पहिला, नववा, वडगाव, इंदिरा कॉलनी, सदाशिवनगर आदी ठिकाणी भेट देऊन धोकादायक झाडांची पाहणी करून ती तातडीने हटविण्याची सूचना मनपा कर्मचाऱ्यांना करण्यात आली. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झाडांची पडझड होत असल्याने वीजखांब, चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर जीवितहानीदेखील होण्याचे प्रकार घडले आहेत. विशेषकरून पावसाळ्यात हेस्कॉमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जुनाट झाडे उन्मळून पडण्यासह फांद्यादेखील तुटून पडतात.
यापूर्वीच महापालिका व वनखात्याच्यावतीने संयुक्तरित्या शहरात सर्व्हे करून धोकादायक झाडांची माहिती जाणून घेतली आहे. झाडे हटविण्यासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे ही रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. महापालिकेकडूनच ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार असून तोडलेल्या झाडांची लाकडे शहरातील स्मशानभूमीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. झाडांचा सर्व्हे करताना स्थानिक नगरसेवकांना याची कल्पना देण्यात आलेली नाही, असा आरोप मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत काही नगरसेवकांनी केला होता. त्यामुळे फेरसर्वेक्षण केले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर भाग्यनगर पहिला, आठवा क्रॉस याठिकाणी धोकादायक झाडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापौर मंगेश पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.









