जि. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांचीही उपस्थिती : दुष्काळाबाबत शासनाला अहवाल पाठवणार : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित : सर्वच पिकांवर करपा रोग-अळीचा प्रादुर्भाव
खानापूर : खानापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश न केल्याने शेतकरी संघटनांसह लोकप्रतिनिधीनी खानापूर तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करावा, अशी मागणी केली होती. याची दखल घेत बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी खानापूर तालुक्याचा दौरा केला. आणि प्रत्यक्ष शेताच्या बांध्यावर जाऊन पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, ता. पं. अधिकारी विरनगौडर एगनगौडरसह इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जि. पं. कार्यकारी अधिकारी हर्षद भोयर यांनी सर्वप्रथम नंदगड आणि कसबा नंदगड परिसरातील पिकांची पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकरी, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी भात पिकाची पाऊस नसल्याने अवस्था बिकट बनली असून सर्वच ठिकाणी भातावर करपा आणि पाने गुंडाळणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पाऊस नसल्याने भातपिकासह इतर कोणतीच पिके यावर्षी हाती लागणार नाहीत, यासाठी सरकारने तातडीने दुष्काळग्रस्त यादीत खानापूर तालुक्याचा समावेश करावा, अशी मागणी केली.
कसबा नंदगड येथील व्हन्नव्वादेवी मंदिराकडील तलावाची पाहणी
यानंतर कसबा नंदगड येथील व्हन्नव्वादेवी मंदिराकडील तलावाची पाहणी केली. यावेळी ग्रा.पं. सदस्य प्रविण पाटील, गोपाळ पाटील, कृष्णा पाटील, मोहन पाटील आणि परशराम पाटील यांनी तलावाबाबत सविस्तर माहिती दिली. तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे असून तलाव दोन भागात विभागला गेल्याने तलावाखालील शेतीला नुकसानदायक होत आहे. यासाठी तातडीने तलावाचा विकास होणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जि. पं. अधिकारी हर्षल भोयर यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करू, असे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचा अहवालही तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
झुंजवाड, बिडी, कक्केरी, गस्टोळी, भुरुणकी गावातील पिकांची पाहणी
यानंतर झुंजवाड येथील पिकांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर बिडी, कक्केरी, गस्टोळी, भुरुणकी यासह इतर गावातील पिकांची पाहणी केली आहे. यावेळी रयत संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर कटरी यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची शेतात पाहणी करताना भेट घेऊन दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करत आपण प्रत्यक्ष पाहणी केली असल्याने सरकारला अहवाल पाठवून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आमदारांकडून अधिकाऱ्यांना माहिती
आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना तालुक्यात पावसाचे प्रमाण एकदम अत्यल्प असल्याने सर्वच पिके धोकादायक स्थितीत आहेत. यासाठी सरकारने खानापूर तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करावा, तसेच तालुक्यातील शेतांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे, यासाठी आपण योग्य खानापूर तालुक्यात पाऊस झाल्याने दुष्काळ यादीत समावेश करताना जे काही निकष लावण्यात येतात. त्याच्यात खानापूर तालुका बसत नसल्याने तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळले होते. मात्र ग्राम विकासमंत्र्यांनी ही अंतिम यादी नसल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल देण्याचे सूचित केले होते. त्यानुसार जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्याचा दौरा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दुष्काळ निवारणासाठी रोहयोतून दीडशे दिवस काम देण्याचे नियोजन
याबाबत जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सरकारच्या निकषात खानापूर तालुका बसत नव्हता. मात्र प्रत्यक्ष पाऊस आणि पिकांची स्थिती पाहता तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी मागणी लावून धरण्यात आली होती. यासाठी आज प्रत्यक्ष दौरा करण्यात आला. या दौऱ्यावेळी खानापूर तालुक्यातील सर्वच पिकांची अवस्था पाऊस नसल्याने धोकादायक स्थितीत आहेत. यामुळे सरकारला खानापूर तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्याचा अहवाल लगेच देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच दुष्काळ निवारणासाठी रोजगार हमी योजनेतून दीडशे दिवस काम देण्याचे नियोजनही सुरू आहे. दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून काही प्रमाणात निश्चितच मदत होणार आहे, असे ते म्हणाले. तसेच तालुक्यातील तलावांचेही खोलीकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून याबाबत आराखडा आल्यास याला तातडीने मंजुरी देण्यात येणार आहे.









