आरपीडी महाविद्यालयाला दिली भेट, अधिकाऱ्यांना केल्या सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून यावर्षी आरपीडी महाविद्यालय येथे त्याची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आरपीडी महाविद्यालयाला शनिवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट देवून पाहणी केली आहे.
स्ट्राँगरुम व मतमोजणी केंद्र उभारणीबाबत अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. आरपीडी महाविद्यालयमधून विविध इमारतींची पाहणी केली. मागील निवडणुकीवेळी झालेल्या मतमोजणीबाबत देखील त्यांनी माहिती घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार स्ट्राँग रुम, मतमोजणी कक्ष, पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक ती तयारी करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
मतमोजणी संदर्भात एक आराखडा तयार करावा. निवडणूक आयोगाच्या मान्यते नुसारच ब्ल्युपिंट तयार करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनीही अधिकाऱ्यांशी पार्किंग तसेच इतर सुरक्षाबाबतची चर्चा करुन आढावा घेतला. याचबरोबर योग्य प्रकारे संबंधितांना पाऊल उचलण्याबाबत त्यांनी सूचना केली आहे. पार्किंग करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्या, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता भीमा नायक यांनी स्ट्राँगरुम तसेच मतमोजणी केंद्राबाबतची माहिती दिली. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, प्रांताधिकारी बलराम चव्हाण, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









