व्यापारी, अन्य नागरिकांनी मांडल्या अडचणी, दुकानांच्या पायऱया मोडून वाटांवर मातीचे ढीग टाकण्याचा प्रकार चुकीचा : होडारकर

प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे येथे अंदाजे तीन महिन्यांपासून पालिकेची जुनी बाजार संकुल इमारत मोडून तेथे नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले असून सदर बांधकाम जुन्या पद्धतीने करण्यात येत आहे. यामुळे सदर परिसरात असलेल्या अन्य इमारतांना धोका निर्माण होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत असून यासंदर्भातील येथील व्यापारी व इतर लोकांच्या अडचणींची दखल घेत कुडचडे पालिकेच्या नगरसेवकांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली आणि व्यापाऱयांची गाऱहाणी ऐकली. यावेळी नगरसेवक प्रदीप नाईक, प्रमोद नाईक, बाळकृष्ण होडारकर, सुशांत नाईक, क्लेमेंटिना फर्नांडिस, मंगलदास घाडी, दामोदर बेणे, विश्वास सावंत, माजी नगरसेवक आगुस्तीन फर्नांडिस व इतर माजी नगरसेवक उपस्थित होते.
कुडचडेचा विकास हा आवश्यक आहे. पण स्थानिकांना त्रास करून विकास होत असल्यास ते बरोबर नाही. त्यामुळे आज येथे आम्ही नगरसेवकांनी पाहणी केली आहे. पालिका बाजार संकुलाची नवी इमारत बांधताना जो प्रकार सुरू आहे त्यामुळे भरपूर लोकांना त्रास होत आहे व याहून अधिक त्रास पुढे होण्याची शक्यता दुकानमालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे, याकडे नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी लक्ष वेधले. त्यामुळे सदर काम ताबडतोब थांबविण्यात यावे व आधुनिक यंत्रणेचा उपयोग करून काम करण्यात यावे. तसेच ज्या प्रकारे इमारतीचे काम करण्यासाठी येथे असलेल्या दुकानांच्या पायऱया मोडून वाटा बुजविण्यात आल्या आहेत आणि काही ठिकाणी मातीचे ढीग टाकण्यात आले आहेत ते अत्यंत चुकीचे आहे, असे होडरकर यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.
नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही
पालिकेच्या बाजार संकुलाची जुनी इमारत कमकुवत झाली होती व ती मोडून नवीन बांधणे गरजेचे होते. असे असले, तरी हा प्रकल्प पालिका परिसरात येत असल्यामुळे पालिकेतील नगरसेवकांना विश्वासात घेऊन पुढे जाणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही, असा दावा स्थानिक नगरसेविका क्लेमेंटिना फर्नांडिस यांनी केला. त्याचबरोबर सदर काम करतेवेळी आजुबाजूच्या व्यापाऱयांची काळजी घ्यायला पाहिजे होती. पण त्याचाही अभाव दिसून आला आहे. त्यामुळे येथील व्यापाऱयांनी एकत्र येऊन त्यांना होत असलेल्या अडचणींबद्दल पालिकेला निवेदन सादर करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बाजूच्या इमारतीला भेगा
नवीन इमारत बांधण्याच्या भरात बाजूच्या जुन्या इमारतीत असलेल्या दुकानदारांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. आज ज्या प्रकारे काम सुरू आहे त्यात दुकानांच्या पायऱया मोडून काही ठिकाणी मातीचे ढीग ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहक येण्याचे बंद झाले आहे. तसेच इमारतीसाठी जे खांबे उभारण्याचे काम सुरू आहे त्यामुळे बाजूच्या इमारतीला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे व स्थिती धोकादायक बनली आहे. त्यामुळे सदर काम ताबडतोब थांबवावे व अन्य पद्धतीने करण्यात यावे, अशी मागणी बाजूच्या इमारतीतील दुकानमालक रवींद्र लाड यांनी केली आहे.
आज प्रत्येक त्रास तक्रार केल्याशिवाय बंद होत नाही. हे चुकीचे आहे. एक दुकानदार या नात्याने आपण तक्रार केलेली आहे, पण त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्याचा आपण निषेध करतो. तसेच येथे होत असलेले काम हे विकासाचे काम असले, तरी त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर काम दुसऱया पद्धतीने करण्यात यावे, अशी मागणी दुकानदार सिरील यांनी केली. येथे काम सुरू करताना कोणतीच काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे दुकानात व गोदामात जाण्या-येण्यासाठीच्या वाटा बंद झाल्या आहेत. येथे टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱयांतून धूळ दुकानांमध्ये जाते. त्यामुळे दुकानांतील माल खराब होत आहे. या सर्व गोष्टींना स्थानिक आमदार नव्हे, तर कुडचडे-काकोडा नगरपालिका जबाबदार आहे, असे व्यापारी काकोडकर यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.









