आचरा प्रतिनिधी
चिंदर गावात आलेल्या साथसदृश्य आजाराने 97 बाधित तर43 मरण पावली आहेत. शवविच्छेदन अहवालानुसार चारयातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अहवाल असून त्यावर खात्री करण्यासाठी पुणे प्रयोगशाळेचे पथक येवून आवश्यक नमुने घेतल्या नंतरच रोगाचे निश्चित कारण समजेल असे चिंदर गावात पाहणीसाठी दाखल झालेल्या कोकण विभाग पशुसंवर्धन प्रादेशिक सहआयुक्त डॉ प्रशांत कांबळे यांनी चिंदर येथे सांगितले.
बुधवारी दुपारी चिंदर येथे दाखल झालेल्या डॉ कांबळे यांनी चिंदर भटवाडी,गावठणवाडी भागातील बाधित जनावरांची पहाणी केली. केली यावेळी त्यांच्या सोबत सिंधुदुर्ग जि. प. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अतुल डांगोरे, जि. प.पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, मालवण तहसिलदार श्रीमती वर्षा झालटे, ,भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, प्रभारी सरपंच दिपक सुर्वे,मंडल अधिकारी अजय परब, डॉ रविंद्र दळवी, डॉ तुषार वेर्लेकर, डॉ शिवाजी लोखंडे, डॉ विवेक ढेकणे, आदी सहभागी झाले होते.
पुणे येथील टीमकडून जलरक्त नमुने, परिसरातील गवताचे नमुने तपासले जाणार
जनावरामधे साथ सदृश्य रोग आला आहे. त्यावर विच्छेदन अहवालानुसार चारयातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अहवाल असून निश्चित निदान होणे गरजेचे आहे म्हणुन निश्चित कारण शोधण्यासाठी पुणे येथून पश्चिम विभागीय प्रयोगशाळेची टीम चिंदर गावात दाखल होणार असून आहे ती टीम जी जनावरे आजारी आहेत त्यांचे रक्तजल नमुने व त्याचबरोबर परीसरातील गवत, खद्यजण पदार्थ यांचे नमुने घेणार आहे त्याचे परीक्षण होऊन रिपोर्ट आल्यावर आजाराचे निश्चित कारण समोर येणार आहे अशी माहिती पाहणी दरम्यान कोकण विभाग पशुसंवर्धन प्रादेशिक सहआयुक्त डॉ प्रशांत कांबळे यांनी दिली.
आजारी गुरांची माहिती दया: डॉ कांबळे
यावेळी बोलताना डॉ कांबळे यांनी हा रोग नष्ट करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी मालवण, कणकवली, देवगड, येथील पशुवैद्यकीय पथके याभागात कार्यरत असून पूर्ण साथ नियंत्रणात येईपर्यंत ती कार्यरत राहणार आहेत. शेतकऱ्यांनी जनावरे मलूल ,आजारी दिसल्यास तातडीने पशुवैद्यकीय विभागाच्या निदर्शनास आणून द्यावीत असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी या भागाची प्रादेशिकता लक्षात घेवून पशुवैद्यकीय दवाखाने वाढविण्याची डॉ कांबळे यांच्या कडे मागणी केली.









