मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेंगळूर येथे ज्येष्ठ नागरिक कार्यक्रम
बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांच्या अनुकुलतेसाठी एकाच छत्राखाली त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. बेंगळूर येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. सध्या असलेल्या जिल्हा केंद्रांमध्ये अनेक त्रुटी असून सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्या दूर करून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जातील. खरे तर आपण आपल्या आई-वडिलांचा उत्तमप्रकारे सांभाळ केला पाहिजे. ही जबाबदारी युवकांनी लक्षात घेतली पाहिजे. ज्येष्ठांची मने न दुखावता त्यांचा सांभाळ करणे गरजेचे आहे, ही आपली संस्कृती आहे, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महिला व बाल कल्याण खात्याचे कार्यवाह डॉ. जे. सी. प्रकाश, संचालक एन. सिद्धेश्वर आदी उपस्थित होते.









