वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम
वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींनी ऑपरेशन थिएटरमध्येही इस्लामी धार्मिक वेषभूषा आणि पूर्ण बाह्यांचे स्क्रब जॅकेट घालून शस्त्रक्रिया करण्याची अनुमती महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे मागितली आहे. तथापि, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्वरित तशी अनुमती देण्यास नकार दिला आहे.
इस्लाम धर्माच्या आज्ञेनुसार महिलांना सदासर्वकाळ हिजाब परिधान करुन वावरावे लागते. मात्र, शस्त्रक्रिया वेषभूषेच्या नियमानुसार शस्त्रक्रियागृहात हिजाब परिधान करता येत नाही. त्यामुळे तेथे त्यांना धर्माची आज्ञा पाळता येत नाही. यावर उपाय म्हणून त्यांना पूर्ण बाह्या असलेली विशिष्ट वेशभूषा करण्याची अनुमती देण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, यावर महाविद्यालयाचे प्रशासन निर्णय घेणार नाही. शस्त्रक्रिया विशारदांची आणि स्वच्छता तज्ञांची बैठक बोलाविली जाईल. या बैठकीत जो निर्णय होईल, त्यानुसार व्यवस्थापन काम करेल, असे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या विद्यार्थिनींसमोर स्पष्ट केले.
वैद्यकीय क्षेत्रात धर्म नको
वैद्यकीय क्षेत्रातील कार्ये आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार आणि त्याच आचारसंहितेनुसार होणे आवश्यक आहे. तेथे धर्माची लुडबूड चालू दिली जाऊ नये. शस्त्रक्रियागृहात किंवा रुग्णालयाच्या कोणत्याही भागांमध्ये रुग्णाची सुरक्षितता आणि त्याचे हित यांनाच प्राधान्य दिले जाते. कोणत्या धर्माची आज्ञा काय आहे, याच्याशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आदर्श संहितेचा भंग होईल, अशी कोणतीही कृती करण्यास कोणालाही अनुमती देण्यात येऊ नये, असे आवाहन केरळमधील शस्त्रक्रिया विशारदांच्या संघटनेने केले आहे.









