भुतेखेते आणि पिशाच्चांच्या अनेक गोष्टींशी आपला परिचय आहे. अनेकांचा भुतांच्या अस्तित्वावर विश्वास असतो. अनेक स्थाने किंवा घरे भुतांच्या वास्तव्याची म्हणून ओळखली जातात. अशा वास्तू कितीही मोठ्या किंवा आकर्षक असल्या तरी त्या कोणी विकत घेत नाही. विशेषत: खेड्यांमध्ये या समजुती मोठ्या प्रमाणात आहेत. शहरी सुशिक्षित समाजातील अनेकजणही भुतांना घाबरत असतात. अमेरिकेसारख्या आधुनिक देशातही अशी काही घरे आहेत. त्यांच्यापैकी एक घर सध्या चर्चेत आहे. ते 200 वर्षांपूर्वीचे असल्याची महिती दिली जाते. गेली अनेक दशके ते विकले न गेल्याने रिकामेच पडलेले होते. हे घर अमेरिकेतील सर्वात मोठे ‘भूतघर’ म्हणून ओळखले जाते. अखेरीस काही दिवसांपूर्वी या घराला एक ग्राहक मिळाला. एका दांपत्याने हे घर आत जाऊन न पाहताच खरेदी करण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला. पण या दांपत्याने तो मानला नाही. त्यांनी रीतसर या घराची खरेदी करुन ताबाही घेतला.
नंतर या जोडप्याने आत जाऊन पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा आणि भीतीचाही धक्कच बसला. आतील दृष्य पाहून त्यांची पाचावर धारण बसली. हे घर काईल व्हिलर आणि अलेहा जेन या जोडप्याने खरेदी केले असून ते सेंट लुईस येथे आहे. त्यांनी हे घर भारतीय रुपयांच्या भाषेत साधारणत: 1 कोटी 82 लाखात खरेदी केले आहे. ते त्यांना अमेरिकेच्या मानाने कमी दरात मिळाले आहे, कारण ते खरेदी करण्याची कोणाची इच्छा नव्हती. घर घेतल्यानंतर या दोघांनी जेव्हा त्यात ‘गृहप्रवेश’ केला, तेव्हा तेथे त्यांना एक मानवी अस्थिपंजर आढळला. तसेच या घरात अनेक चित्रविचित्र घटना घडत असल्याचाही अनुभव त्यांना आला. घरातील डिटेक्टर अलार्म रात्री अपोआप वाजू लागला. काईल याने तो बंद करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा स्पर्श होण्यापूर्वीच तो अपोआप बंद झाला. या घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोणीतही चालत आहे, असा भास त्यांना खालच्या मजल्यावर होऊ लागला. वर जाऊन पाहिले असता कोणीही दृष्टीस पडत नसे. मात्र, जेव्हा त्यांना या घराच्या तळघरात अस्थिपंजर सापडला, तेव्हा पोलिसांना बोलावणे भाग पडले. आता हे घर सरकारने ताब्यात घेतले असून ते सील करण्यात आलेले आहे. आजही त्याची ख्याती भूतबंगला अशीच आहे.









