काळजी घेऊन फवारणी करावी असा सल्ला कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलाय
कोल्हापूर : सध्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा फवारणीत मग्न आहे. यावेळी उपाशीपोटी राहणे किंवा तंबाखू, मद्यपान करून विषारी कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे विषबाधेला सामोरे जावे लागते. त्यामुळे काळजी घेऊन फवारणी करावी असा सल्ला कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
सध्या शेतामध्ये पिकांवर तणनाशक, कीटकनाशक फवारणी सुरू आहे. त्यासाठी फवारणीदरम्यान हात स्वच्छ धुवावे, फवारणी झाल्यानंतरच तोंडाला स्पर्श करावा, फवारणी करताना तंबाखू चोळणे, जेवण करणे धोकादायक ठरू शकते. यातून विषबाधा होण्याचा धोका अधिक असतो.
फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमध्ये कीटकनाशके अत्यंत विषारी मानली जातात. अशा रसायनांची फवारणी करताना त्याचा मानवी शरीरावर आणि श्वसनमार्गावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो सायंकाळच्या वेळेस, अन्न सेवन केल्यानंतर आणि योग्य संरक्षक साधनांचा वापर करूनच फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
विषबाधेची लक्षणे डोळ्यांची किंवा त्वचेची जळजळ, उलटी, चक्कर येणे, श्वास घेण्यास अडचण, थकवा आणि पोटदुखी ही विषबाधेची सामान्य लक्षणे आहेत. अशी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे अत्यावश्यक आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सतर्कता गरजेची ऑगस्ट महिना हा पिकांच्या वाढीसोबत फळधारणेसाठी महत्त्वाचा असतो.
पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी करत आहेत. कृषी विभागाने शेतक्रयांमध्ये सजगता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विषबाधा झाल्यास काय कराल? विषबाधा झालेल्या व्यक्तीला ताबडतोब स्वच्छ आणि मोकळ्या हवेत जाऊन बसावेत. जर विषारी औषध डोळ्यात गेले असेल, तर डोळे स्वच्छ पाण्याने 10 ते 15 मिनिटे धुवावेत.
लगेच डॉक्टरकडे घेऊन जावे. उपचारांसाठी जाताना फवारणी केलेल्या कीटकनाशकाची बाटली सोबत घेऊन जावेत जेणेकरून योग्य उपचार करता येतील.
कीटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी
- कीटकनाशके वापरताना हातमोजांचा वापर करावा
- कीटकनाशके वापरताना त्याचा संपर्क डोळ्यांशी होऊ नये म्हणून चष्मा वापरावा
- कीटकनाशके फवारताना त्याचा संपर्क नाका–तोंडाशी होऊ नये म्हणून मास्कचा वापर करावा.
- कीटकनाशके फवारताना ती नेहमी वाऱ्याच्या दिशेने फवारणी.
- कीटकनाशकांचा वापर झाल्यावर हात–पाय व तोंड स्वच्छ धुवावेत आणि नंतरच पाणी प्यावे किंवा खावे
- कीटकनाशकांचे साठे लहान मुलांचे हात पोहोचणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावेत.
- कीटकनाशकांचा साठा जनावरांपासून व त्यांच्या खाद्यापासून दूर ठेवावा.
- कीटकनाशके फवारताना नेहमी योग्य बुटांचा वापर करावा.
- कीटकनाशकांची फवारणी पाण्याच्या साठ्यापासून दूर करावी.








