शेतकरी चिंतेत, उत्पादनात घट होण्याची शक्यता
बेळगाव : मागील आठवड्याभरापासून सुरू झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा समाधानकारक मान्सूनमुळे वेळेत पेरणी झाली आहे. मात्र आता बदलत्या हवामानाचा परिणाम सोयाबीन आणि इतर पिकांवर झाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, उडीद, ज्वारी, तूर, कापूस, मका, आदी पिकांची पेरणी व लागवड झाली आहे. एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र आता या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून योग्य सल्ला द्यावा, अशी मागणीही होत आहे.
विशेषत: बैलहेंगल, रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्यामध्ये या रोगाची तीव्रता अधिक दिसून येत आहे. पिकाच्या पानावर पिवळे, काळे डाग पडू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढत आहे. त्याबरोबर अथणी, बैलहोंगल, हुक्केरी, बेळगाव, निपाणी, चिकोडी तालुक्यातील उडीद, सोयाबीन, वाटाण आणि मका पिकांवर (तांबे) रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. पिकांच्या पानाच्या खालच्या बाजूला तपकिरी डाग दिसत आहेत. त्यामुळे झाडाची पाने जळणे किंवा गळून पडणे असे प्रकारही पहावयास मिळत आहेत. काही पिकांची पाने किडे खात असल्याच्याही तक्रारी शेतकरी करीत आहेत. रोगाचा प्रादुर्भाव असाच कायम राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी खात्याने किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी उत्पादकांनी केली आहे.
कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना सल्ला
सोयाबीन आणि इतर पिकांच्या पानावर काही प्रमाणात बुरशी आणि इतर रोग दिसून येत आहे. कृषी खात्याच्या अधिकारी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला देत आहेत.
-शिवनगौडा पाटील, (सहसंचालक कृषीखाते)









