मनपा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ : अंड्यांपाठोपाठ अल्पोपाहाराच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह
बेळगाव : सफाई कामगारांना निकृष्ट दर्जाची अंडी दिली जात असल्याचे प्रकरण गाजत असतानाच गुरुवारी सफाई कामगारांना देण्यात आलेल्या भाजीमध्ये कीटक आढळून आला आहे. गोवावेस परिसरातील सफाई कामगारांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून सफाई कामगारांच्या आरोग्याशी महापालिका खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे याबाबत सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने महापालिका आयुक्तांना जाब विचारला जाणार आहे. महापालिकेच्या सफाई कामगारांना तीन महिन्यांपासून अल्पोपाहार दिला जात आहे. अल्पोपाहाराबरोबरच अंडीही दिली जात असून अल्पोपाहार पुरविण्याची जबाबदारी महांतेश मॅगीनमनी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सुरुवातीला दोन महिने चांगल्या दर्जाचा अल्पोपाहार आणि अंडी देण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अल्पोपाहार व अंड्यांचा दर्जा घसरत चालला आहे.
दोन दिवसांपूर्वी देण्यात आलेली अंडी निकृष्ट दर्जाची होती. काही अंड्यांमध्ये पाणी धरण्यासह काळी पडली होती. त्यामुळे कामगारांनी सदर अंडी खाण्याऐवजी फेकून दिली. याबाबत सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर ही बाब आयुक्तांनी गांभीर्याने घेतली. तातडीने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यासह या प्रकाराची चौकशी करण्याची जबाबदारी प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यावर सोपविली आहे. यामध्ये ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्यायादीत घातले जाणार आहे. सध्या अंड्यांचे प्रकरण तापले असतानाच गुरुवारी सफाई कामगारांना देण्यात आलेल्या भाजीमध्ये कीटक आढळून आला आहे. सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेण्यात आली आहे. सफाई कामगार हे देखील माणूसच असून त्यांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली जाऊ नये, असा आरोप केला जात आहे. या प्रकाराबाबत मनपा आयुक्तांना भेटून जाब विचारण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.









