ऑनलाईन टीम / तरुण भारत :
स्वदेशी बनावटीची शक्तीशाली युद्धनौका INS मुरमुगाव भारतीय नौदलात सामील होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या (दि.18) मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे या युद्धनौकेचे जलावतरण करतील. या युद्धनौकेमुळे हिंदी महासागरात नौदलाची पोहोच वाढून देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.
नौदलाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही युद्धनौका रिमोट सेन्सर मशीन, आधुनिक रडार, जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यासारख्या शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे. या युद्धनौकेची लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7,400 टन आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने या युद्धनौकेचे डिझाईन केले आहे. भारतात बांधलेल्या सर्वात प्राणघातक युद्धनौकांमध्ये याची गणना केली जाऊ शकते.
अधिक वाचा : वसंत मोरे समर्थक माझिरेंचा शिंदे गटात प्रवेश
गोव्याच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेल्या मुरमुगाव या ऐतिहासिक बंदर शहरावरून या नौकेला हे नाव देण्यात आले आहे. हे जहाज प्रथम 19 डिसेंबर 2021 रोजी समुद्रात उतरले, त्याच दिवशी गोव्याने पोर्तुगीज राजवटीपासून मुक्तीची 60 वर्षे पूर्ण केली. नौदलाच्या प्रकल्प-15बी अंतर्गत 2025 पर्यंत आणखी दोन युद्धनौका नौदलाला मिळणार आहेत.