मुंबई डॉकयार्डमधील घटना : नौदलाकडून चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाची युद्धनौका ‘आयएनएस ब्रह्मपुत्रा’मध्ये अचानक आग लागल्यामुळे पूर्णपणे निकामी झाली आहे. ही युद्धनौका मुंबई डॉकयार्डमध्ये असताना रविवारी संध्याकाळी आग लागली होती. त्यानंतर सोमवारी सकाळपर्यंत आग विझवण्यात आली. मात्र, सायंकाळी ही युद्धनौका एका बाजूला झुकली. या घटनेनंतर एक खलाशीही बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. भारतीय नौदलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये आयएनएस ब्रह्मपुत्रा दुऊस्तीचे काम सुरू असताना रविवारी संध्याकाळी आग लागली. त्यानंतर आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले. तिला हळूहळू धक्क्यावर आणण्यात आले असले तरी कलंडलेल्या स्थितीत असल्याचे सांगण्यात आले. नेव्हल डॉकयार्ड, मुंबई आणि बंदरातील इतर जहाजांच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी युद्धनौकेचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी दुपारी जहाज एका बाजूला झुकलेले दिसले. दिवसअखेरपर्यंत अथक परिश्रम करूनही युद्धनौका सरळ स्थितीत आणता आली नाही. या दुर्घटनेनंतर एक कनिष्ठ खलाशी वगळता सर्व कर्मचारी सुस्थितीत आहेत. बेपत्ता खलाशाचा शोध सुरू आहे.
युद्धनौकेची क्षमता
आयएनएस ब्रह्मपुत्रा ही स्वदेशी बनावटीची तसेच ‘ब्रह्मपुत्रा’ वर्गातील मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट आहे. ही युद्धनौका एप्रिल 2000 मध्ये भारतीय नौदलात सामील झाली होती. आयएनएस ब्रह्मपुत्रेचे वजन 5,300 टन असून त्याची लांबी 125 मीटर आणि उंची 14.4 मीटर आहे. ही युद्धनौका 27 समुद्री मैलांपेक्षा जास्त वेगाने धावू शकते. जहाजावर 40 अधिकारी आणि 330 खलाशी तैनात ठेवण्यात आले होते. या जहाजामध्ये सागरी युद्धाच्या सर्व पैलूंचा समावेश करणारे सेन्सर्सची विस्तृत श्रेणी आहे. तसेच सीकिंग आणि चेतक हेलिकॉप्टर चालविण्यास सक्षम आहे.









