कोल्हापूर :
बनावट धनादेशाद्वारे जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाच सदस्यीय समिती गठीत केली होती. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने या प्रकरणाची चौकशी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार संबंधित दोषींवर पुढील कारवाई केली जाणार आहे.
या फसवणुकीच्या चौकशीसाठी पूर्वी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीमधील काही अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या कार्यकक्षेबाहेरील होते. संबंधित अधिकारी हे वित्त विभागातील असल्यामुळे चौकशी करण्यासाठी त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकारी अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावेत असे त्यांनी स्पष्टपणे सीईओंकडे नमूद केले होते. त्यामुळे सीईओंंनी त्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना कळविल्यानंतर त्यांनी जुन्या त्रिसदस्यीय समितीमध्ये अध्यक्ष असलेले सुशील केंबळे यांना समिती सदस्य करून अध्यक्ष म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांची नियुक्ती केली होती. या समितीने चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.
बनावट धनादेशाद्वारे जिल्हा परिषदेची 57 कोटी 4 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक टळली असली तरी या घटनेची जिल्हा परिषद प्रशासनाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी सीईओ कार्तिकेयन एस यांनी समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने चौकशी करून त्याबाबतचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे निर्देश सीईओंनी दिले होते. त्यानुसार चौकशी पूर्ण करून या समितीने मंगळवारी बैठक घेऊन त्यामध्ये अहवाल तयार केला आहे. तो अहवाल बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असल्याची माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी दिली.
चार दिवसांत कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी वित्त विभागातील धनादेश, त्यांच्या सुरक्षेची उपाययोजना, तांत्रिक माहिती याबाबत चौकशी करून काही जणांचे जबाब घेतले होते. या प्रकरणामध्ये वित्त विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतल्याचीही दखल घेण्यात आली असून, त्यांच्यामुळे जिल्हा परिषदेचा 18 कोटी रुपयांचा निधी परत मिळाल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे या फसवणूक प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेच्या यंत्रणेचा कोणताही दोष नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान याबाबत पोलीस प्रशासनाकडूनही चौकशी सुरु आहे.
- जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बनावट धनादेशाद्वारे जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याच्या घटनेची चौकशी पूर्ण झाली आहे. त्याबाबतचा अहवाल बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
संतोष जोशी, चौकशी समिती अध्यक्ष








