सांगली :
मनपाचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्तांच्या कार्यकाळातील भ्रष्ट कारभार प्रकरणाची शासनाकडून चौकशी सुरू आहे. याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मनपाच्या असलेल्या सुमारे 135 कोटींच्या ठेवी खासगी बँकेत वळवून दीड कोटीचे नुकसान केल्या प्रकरणी शासनाला अहवाल देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
सांगलीतील 24 मजली इमारतीच्या परवानगी प्रकरणात उपायुक्त वैभव साबळे यांना अटक झाल्यानंतर तक्रारदारांनी या प्रकरणी तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांना सहआरोपी करण्याची मागणी केली होती. मनपा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण सत्ताधारी भाजपाला अडचणीत आणण्यास उपयुक्त ठरू शकत असल्याने विरोधकांनी यावर आवाज उठविण्यापूर्वीच भाजप आमदारांनी हा मुद्दा लावून धरण्यास सुरूवात केली आहे. आमदार गोपीचंद पडळाकर यांनी मनपा प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढत नियोजन मंडळाची सभा गाजवली. याबाबत पालकमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.
नियोजन बैठकीत आयुक्त गुप्ता यांच्या कारभारावर आमदार पडळकर यांच्यासह काहींनी पालकमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. याबाबत पत्रकार बैठकीत विचारले असता पालकमंत्री म्हणाले, आयुक्त गुप्ता आणि लेखाधिकारी मेंडगुळे यांच्यामुळे मनपाचे दीड कोटीचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. हे नुकसान त्यांच्याकडून वसुल करावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे. याप्रकरणाचा शासनाकडे अहवाल देण्यात आला आहे. शासन पुढील कारवाई करेल.
- जिल्हा नियोजन बैठकीत पडसाद
आयुक्त गुप्ता यांच्या कार्यकाळातील अनेक तक्रारी आहेत, त्यांनी भ्रष्ट कारभार केल्याची प्रकरणे बाहेर येत आहेत. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर पुढील कारवाई होईल. आयुक्त गुप्ता यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील अनेक घटनांचा पाढा वाचला जात आहे. त्यांना साथ दिलेल्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या विभागात उच्छाद मांडला आहे. याच्या रोज तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्याचे पडसाद सोमवारी झालेल्या नियोजन बैठकीत उमटले.








