गैरकारभाराच्या तक्रारीवरून कार्यवाही : बेंगळूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पथकाने गाळेधारकांची घेतली माहिती
बेळगाव : गोवावेस येथील खाऊकट्ट्याचे बांधकाम नियमांचे उल्लंघन करून करण्यात आले आहे. याठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या गाळ्यांचे वितरण करताना पक्षपातीपणा करण्यात आला आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली होती. यावरून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चौकशी पथकाकडून कामाची पाहणी करून गाळेधारकांची माहिती घेतली. बेंगळूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंते के. दुर्गाप्पा यांच्या नेतृत्वामध्ये सहा सदस्य असणाऱ्या पथकाकडून ही चौकशी करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या गोवावेस येथील खाऊकट्ट्याची उभारणी करताना बांधकाम नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. नाल्यापासून विशिष्ट अंतरावर बांधकाम करणे बंधनकारक आहे. मात्र खाऊकट्टा उभारताना या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. हे बांधकाम बेकायदेशीर झाले आहे. तर उभारण्यात आलेल्या खाऊकट्ट्यामध्ये निर्माण करण्यात आलेले गाळे गोरगरीब, निराधार, विधवा, दिव्यांग आदींना वितरण करणे आवश्यक आहे. असे असताना लोकप्रतिनिधींकडून नियमांचे उल्लंघन करून आपल्या मर्जीतील व्यक्तींना गाळे वितरण करण्यात आले आहेत. तसेच गाळे लिलाव करण्यासाठी जाहीर निवेदन देणे आवश्यक आहे. यामध्येही गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला. गाळे लिलाव करताना मोठ्या वृत्तपत्रात लिलावाची जाहिरात न देता लहान वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन अधिक नागरिक लिलावामध्ये भाग घेऊ नयेत, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
सहा जणांच्या पथकाची नियुक्ती
लोकप्रतिनिधींनी आपल्या मर्जीतील नागरिकांसह आर्थिकरित्या सबळ असणाऱ्या नागरिकांना हे गाळे लिलाव केले आहेत. त्यामुळे गोरगरिबांना सरकारच्या योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. नगरसेवकांच्या कुटुंबांतील सदस्यांसह लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना गाळे वितरित करण्यात आले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खाऊकट्ट्याच्या कामाची व गाळे वितरण प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सहा जणांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथकाने खाऊकट्ट्याला भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. प्रत्येक गाळ्यातील परवाना तपासणी करून उपस्थित असणाऱ्या गाळेधारकांकडून माहिती घेण्यात आली. यादरम्यान काही जणांनी आपल्याला गाळा मिळाला नसला तरी आपल्या नावे परवाना देण्यात आला आहे. मात्र आपल्याला गाळा मिळाला नसल्याची तक्रार केली. सायंकाळी उशिरापर्यंत बांधकाम खात्याच्या चौकशी पथकाकडून गाळेधारकांची माहिती घेतली जात होती. या पथकामध्ये बेंगळूर येथील मुख्य अभियंते के. दुर्गाप्पा, धारवाड येथील अभियंते विमला काळे, अभियंते अरुणकुमार पाटील, धारवाड येथील अभियंते कुडलकट्टी, अभियंते पी. बी. प्रकाश, बेंगळूर येथील अभियंते अजित आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
खाऊकट्ट्याच्या बांधकामाची चौकशी होत असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणांवरून वादावादी झाली. त्यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला होता. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले. अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अहवाल वरिष्ठांना देण्यात येणार
बांधकाम खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या सदर कामाची पाहणी करण्यात येत आहे. गाळेधारकांना वितरण करण्यात आलेला परवाना, बांधकाम परवाना आदींची तपासणी करण्यात येत आहे. याबरोबरच मनपामध्येही चौकशी केली जाणार असून गाळे वितरणामध्ये नियमांचे पालन करण्यात आले की नाही? याची पाहणी करण्यात येत असून एकट्याकडून तक्रार करण्यात आली आहे. त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल.
– के. दुर्गाप्पा, मुख्य कार्यकारी अभियंते-बेंगळूर









