जिल्हा रुग्णालयाला भेट : रुग्णांचा वैद्यकीय खर्च सरकार उचलणार
बेळगाव : टेम्पो उलटून जखमी झालेल्या रोहयो कामगारांच्या तब्येतीची पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवार दि. 24 रोजी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विचारपूस केली. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांचा वैद्यकीय खर्च सरकार उचलणार असून त्यांना रोहयोतून अर्ध्या दिवसाचा पगारही दिला जाणार असल्याचे यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रोजगार हमी योजनेच्या कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो गुरुवार दि. 23 रोजी सकाळी हुक्केरी तालुक्यातील होसूरजवळ उलटल्याने यामध्ये 36 जण जखमी झाले होते. यमकनमर्डीहून हिडकल डॅमकडे जाताना हा अपघात घडला होता. यापैकी 30 जखमींना जिल्हा रुग्णालयात तर सहा जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातानंतर यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सर्व जखमी यमकनमर्डी मतदारसंघातील असल्याने शुक्रवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांना बिम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा वैद्यकीय खर्च सरकार करणार असून त्यांना रोहयोतून अर्ध्या दिवसाचा पगारही दिला जणार आहे, असेही यावेळी पालकमंत्री जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इराण्णा पल्लेद यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.









