भाजपची मागणी : नागरिकांवर हल्ले होत असल्यावरून अधिकारी धारेवर : निर्बिजीकरण करूनही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली कशी : राहूल चिकोडे यांचा सवाल
कोल्हापूर प्रतिनिधी
महानगरपालिका भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरली आहे. यामुळेच शहरात नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत आहेत. प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मग शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली कशी असा सवाल भाजपच्यावतीने करत मनपाने केलेल्या निर्बिजकरणाची चौकशीची मागणीही केली.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत भारतीय जनता पार्टीच्यावतीने मागील आठवड्यात आवाज उठवला होता. यावेळी संबंधित खाते प्रमुख यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने भाजपा शिष्टमंडळाला दिले होते यानुसार बुधवारी मनपामध्ये अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी संबंधित अधिकारी, भाजप शिष्टमंडळ यांची बैठक घेतली. महापालिकेतील भोंगळ कारभार पुन्हा समोर आला. भाजपाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि या विषयातील कागदपत्रे देखील अधिकारी वर्गांनी सोबत आणली नव्हती. त्यामुळे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहूल चिकोडे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांना धारेवर धरले.
चिकोडे म्हणाले, रस्त्यांवर ठिक-ठिकाणी असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल यातून होणारा कचरा यामुळे मोकाट कुत्री नागरीकांवर हल्ले करत आहेत. याकडे कोणाचेच लक्ष नाही. इतर राज्यात कुत्र्यांचे शंभर टक्के निर्बीजीकरण होत असेल तर कोल्हापुरात याचे काम पूर्णत्वास का जात नाही, हा संशोधनाचा विषय आहे.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी डॉग स्कोडचे नंबर महापालिकेने सोशल मिडिया, प्रिंट मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करावेत, अशी सूचना मांडली. यावेळी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, राजसिंह शेळके, रूपाराणी निकम, उमा इंगळे, संतोष भिवटे, अनिल कामत, विजय आगरवाल यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर डॉ. विजय पाटील यांनी निर्बिजीकरणाची प्रक्रिया येत्या 100 दिवसात पूर्ण करू. त्याचबरोबर भाजपने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येत्या 10 दिवसात देऊ, असे सांगितले. गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, अजिंक्य चव्हाण, विराज चिखलीकर, दीपक जाधव, गणेश देसाई, माधुरी नकाते, धनश्री तोडकर, संगीता खाडे, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर आदी उपस्थित होते.
खोटी माहिती दिली तर सोडणार नाही
राहूल चिकोडे यांनी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या आाणि आतापर्यंत झालेल्या निर्बिजिकरणाबाबत माहिती विचारली असता डॉ. पाटील यांनी शहरात साडे सहा हजार भटकी कुत्री असून 5 वर्षात निर्बिजकरणावर 18 लाखांचा खर्च झाल्याचे सांगितले. यावर प्रत्यक्षात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असून खोटी मोहिती दिली तर सोडणार नाही, अशा शब्दात चिकोडे यांनी डॉ. पाटील यांना सुनावले.