काँग्रेस नेते संजय बर्डे यांची मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मागणी, गृहरक्षकांच्या वेतनातील लाखो ऊपये लाटले जात असल्याचा आरोप
पणजी : पोलीस दल, वाहतूक पोलीस यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र सेवा देणाऱ्या गृहरक्षक (होमगार्ड) जवानांवर अन्याय होत असून, ते अगदी अल्प पगारात सेवा देत आहेत. महिन्यातील सर्व दिवस सेवा देऊनही त्यांना केवळ 26 दिवसांचे वेतन देण्यात येत आहे. हा प्रकार गंभीर असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेच गृहखाते असल्याने गृहरक्षक जवानांचे 30 दिवसांच्या वेतनापैकी 4 दिवसांचे वेतन कोण लाटतो, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय बर्डे यांनी केली. पणजीतील आझाद मैदानावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बर्डे बोलत होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते राज भोसले, सिद्धेश मोरे, चंदन कळंगुटकर आदी उपस्थित होते.
संजय बर्डे यांनी सांगितले की, गृहरक्षकांना दिवसाकाठी 850 ऊपये वेतन मिळत आहे. या गृहरक्षकांना पोलीस व वाहतूक पोलिसांसारख्या अन्य सोयी-सुविधा मिळत नसतानाही ते महिन्याचे संपूर्ण दिवस सेवा देतात. परंतु त्यांना केवळ 26 दिवसांचेच वेतन देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. वास्तविक पेट्रोल किंवा इतर कोणत्याही स्वऊपाचे सरकारी भत्ते मिळत नसतानाही हे गृहरक्षक प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. तरीही चार दिवसांचे वेतन कापले जात आहे. हे चार दिवसांचे वेतन नेमके कुणाच्या खिशात जातात, याची चौकशी गृहमंत्री या नात्याने प्रमोद सावंत यांनी करावी. राज्यात 1400 गृहरक्षक सेवा बजावत आहेत. प्रत्येकी गृहरक्षकांचे 4 दिवसांचे कपात केलेले वेतन धरल्यास लाखो ऊपये लाटले जात आहेत. याचा सारासार विचार मुख्यमंत्र्यांनी करून गृहरक्षकांना न्याय द्यावा, असेही बर्डे म्हणाले. वाळपई, सांगे, काणकोण अशा दूरवरच्या तालुक्यातून आपल्या पगारातून पेट्रोल खर्च भागवून हे गृहरक्षक पणजी, म्हापसा आदी ठिकाणी सेवा देत आहेत. त्यामुळे या गृहरक्षकांना पूर्णपणे वेतन मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रेमानंद शेट यांच्याकडून गृहरक्षकांचा अवमान
मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी एका गृहरक्षकाचा अवमान केला असून, आमदार शेट यांचे वर्तन अयोग्य आहे, असा आरोप संजय बर्डे यांनी केला. एका गृहरक्षक जवानाने पायात बूट घातला नसल्याने आमदार प्रेमानंद शेट यांनी या जवानाला धमकावण्याबरोबच याविषयी जाब विचारल्याची तक्रार आपल्याकडे आली आहे. परंतु प्रेमानंद शेट यांनी गृहरक्षकाला मिळणारे वेतन याचा विचार करायला हवा होता. कोणत्याही सोयी-सुविधांशिवाय हे जवान सेवा बजावत आहेत. त्यांच्याकडून पायात बूट घातला नाही, म्हणून त्यांना जाब विचारताना आमदार शेट शरम वाटायला हवी. आमदार, मंत्री यांना मिळणारे भत्ते हे बेसुमार आहेत आणि त्यामुळेच आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या डोळ्यावर पैशांचा धूर आल्याने गृहरक्षकाला बूट न घातल्याबद्दल धमकावण्याचे धाडस झाल्याचा आरोपही त्यांनी केला.









