सातारा :
सातारा तालुक्यातील खेड ही ग्रामपंचायत मोठी आहे. सार्वजनिक ठिकाणी पडणाऱ्या कचऱ्याच्या अनुषंगाने अनेक प्रयोग केले. बोर्ड लावले, सीसीटीव्ही लावली तरीही कचरा टाकायचं बंद होत नाही. 24 तास तर ग्रामपंचायत कचरा टाकणाऱ्यांची राखण करु शकत नाही. त्यामुळे आता नवा प्रयोग खेड ग्रामपंचायतीच्यावतीने सुरु करण्यात येणार आहे. गावाच्या परिसरात जेथे जेथे प्लास्टिकचा कचरा पडतोय. तेथे प्लास्टिक गोळा करण्यासाठी स्वच्छतादूत नेमण्यात येणार आहेत. त्यांच्यावर नियंत्रण हे खेडमधील महिलांचेच असणार आहे, अशी माहिती खेडच्या सरपंच लता फरांदे यांनी दिली आहे.
कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस भयानक बनली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय योजले जातात. सातारा तालुक्यातील खेड हे सर्वात मोठे गाव आहे. या गावच्या हद्दीत सातारा ते कोरेगाव जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कृष्णानगर ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यान काही लोक येता जाता कचरा टाकतात. काही लोक ही रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. त्यामुळे सातारा शहरानजिक असलेल्या खेडची प्रतिमा मलिन होवू पहात आहे. त्याच अनुषंगाने खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांनी व खेड ग्रामपंचायतीने अनेक उपाययोजना त्यावर आखल्या. कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणी बोर्ड लावले होते. कचरा टाकू नये म्हणून सीसीटीव्ही लावले होते. परंतु कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे पडत असलेला कचरा हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सध्या तरी आठवड्यातुन एकदा उचलून तो योग्यरितीने विल्हेवाट लावण्याचे काम केले जाते. परंतु येत्या पंधरा दिवसात एक नवा प्रयोग हाती घेण्यात येणार आहे.
खेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या माध्यमातून काही महिलांना स्वच्छतादूत असे ओळखपत्र देवून त्यांच्या माध्यमातून प्लास्टिकचा कचरा संकलित करण्यात येणार आहे. हा प्लास्टिकचा कचरा पुनर्वापराकरता देण्यात येणार आहे तर ओला कचरा हा वेगळा करुन त्याच्या माध्यमातून खत निर्मिती केली जाणार आहे. तयार झालेल्या खताची विक्री केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.








