नंदगड येथील काँग्रेसच्या प्रचारसभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आरोप
वार्ताहर /नंदगड
भाजप सरकारने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण कमी करून ते लिंगायत व वक्कलिगांना प्रत्येकी दोन टक्के वाढवून दिले आहे. तर मराठा समाजाचा 3 बी ऐवजी 2 ए वर्गवारीत समावेश करावा, अशी मागणी करूनही त्यांना मात्र काहींही देण्यात आले नाही. राज्यातील भाजप सरकारने विविध समाजांवर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे देशात जोपर्यंत 50 टक्के आरक्षणची मर्यादा काढून टाकली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. असे वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नंदगड येथे काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले, भाजप सरकारने पाच वर्षांत जनतेच्या हाती काही लागू दिले नाही. भाजपचे डबल इंजिन सरकार फेल झाले आहे. काँग्रेसचे सिंगल इंजिन पावरफुल आहे. विरोधात असतानासुद्धा अंजलीताईंनी खानापूर तालुक्यात 800 कोटी रुपयांची विकासकामे करून घेतली. कर्नाटकात काँग्रेसची लाट आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार येणार हे निश्चित आहे. त्यामुळे अंजलीताईंना पुन्हा आमदार केल्यास खानापूरचे चित्र पालटणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महागाई, बेरोजगारी वाढल्याने लोकांना अडचण निर्माण झाली. जनतेच्या पैशाची लूट होत आहे. याबाबत जाब विचारणाऱ्या राहुल गांधी यांना संसदेत बोलायला दिले जात नाही. त्यांच्या हक्कावर गदा आणून लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. त्यांची खासदारकी काढून घेऊन त्यांना 24 तासांत घर खाली करण्यास सांगितले जाते. एका नेत्याची ही अवस्था असेल तर एक दिवस सर्वसामान्य जनतेच्या अधिकारावर ही गदा येणार आहे. भाजपला धडा शिकविण्यासाठी या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. अंजली निंबाळकर बोलताना म्हणाल्या, भाजप फक्त हिंदुत्वाचे राजकारण करत आहे. आम्ही जिजाऊंच्या मुली आहोत. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन राज्य केले. त्यांचेच आदर्श डोळ्यावर ठेवून आम्ही सर्व जाती धर्मांना घेऊन विकासाचे राजकारण करीत आहे. खानापूर तालुक्यातील रस्ते, विद्युत व्यवस्था, शाळा व अंगणवाडी नूतन इमारतीचे बांधकाम, सरकारी दवाखान्याची उभारणी तसेच अन्य विकासाची कामे राबविली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मला पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन निंबाळकर यांनी केले. नंदगडचे ज्येष्ठ नागरिक सी. जी. वाली यांचेही यावेळी भाषण झाले. व्यासपीठावर निजामुद्दीन काझी, रियाज पटेल, प्रकाश मादार, राजेंद्र कब्बूर, जॅकी फर्नांडिस, एम. बी. वाली, आर. एस. पाटील, आर. डी. हंजी, एम. एम. काजी, चंबान्ना होसमणी, महांतेश राऊत, वैष्णवी पाटील, सावित्री मादार, इकबाल बसरीकट्टी, गीता अंबडगट्टी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









