समाजातील नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : पट्टणकुडी (ता. चिकोडी) येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या हेळवी समाजातील नागरिकांवर समाजकंटकांकडून विनाकारण अत्याचार करण्यात येत आहे. समाजातील मुलींची छेडछाड करण्यात येत आहे. आपल्या समाजाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन हेळवी समाज पट्टणकुडी यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पट्टणकुडी येथे 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या हेळवी समाजाला नागरिकांकडून त्रास दिला जात आहे. मुलींची छेडछाड करण्यात येत आहे. तर काही जणांनी मुलींना पळवून नेवून विवाह करून घेतला आहे. असे असले तरी गावातील काही समाजकंटकांकडून आपल्यावर अन्याय केला जात आहे. दि. 11 रोजी रात्री 8 वाजता आपल्या समाजातील नागरिकांच्या घरावर तरुणांच्या एका गटाने हल्ला करून वाहनांची मोडतोड केली आहे. तर अनेक जणांना मारबडव केली आहे. यामुळे आपल्या समाजावर मोठा अन्याय केला जात आहे. याला काही जणांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. अशा नागरिकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गावातील विठ्ठल यंकने, सोमनाथ यंकने, श्रेयश कागे, पद्मन्ना कुरणे, सचिन कुरणे, दादा कुरणे, वासु बने, माळू कवनवर, मंजुनाथ बने, करण हंजारे, अजित बने यांच्याकडून आपल्या हेळवी समाजातील नागरिकांवर हल्ला करण्यात आला आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.









