पुणे / प्रतिनिधी :
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि शिवसेनेने धोका दिल्यानेच संभाजीराजे छत्रपतींना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली असून, सेनेने राजेंवर अन्याय केल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
आठवले म्हणाले, भारतीय जनता पक्षाशी चर्चा केली असती, तर राजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले असते. मात्र, ही राज्यसभा निवडणूक राजेंनी अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्धार केला होता. शिवाय, शिवसेनेने राजेंना शब्द दिला होता. मात्र, दिलेला शब्द सेनेने पाळला नाही. हा अन्याय आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. शिवसेना-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत वाद आहेत. काँग्रेस पाठिंबा ठेवायचा की नाही, यावर विचार करत आहे. काँग्रेसने धाडस दाखवत पाठिंबा काढावा. आम्ही राज्यात सरकार बनवू. काँग्रेस खिळखिळी झाली आहे. काँग्रेसला नेता राहिलेला नाही. कॉग्रेसला अध्यक्ष मिळेना. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा सामना करणे काँग्रेसच्या आवाक्मयात नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
भोंग्याबाबत राज ठाकरे यांची भूमिका अयोग्य आहे. अजान आणि प्रार्थना झाल्या पाहिजेत. निवडणूक आल्या, की असे जातीय राजकारण होते. हे थांबायला हवे. रिपब्लिकन ऐक्य होईल असे वाटत नाही. कोणाच्याही नेतृत्वात ऐक्य झालेच, तर माझा गट त्यात नक्की सहभागी होईल. याआधीही अनेकदा ऐक्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो अयशस्वी राहिला आहे. समाजाने ऐक्य केले, तर आपण प्रत्येकाने एक पाऊल मागे येत त्यात सहभागी व्हायला हवे, असे मतही त्यांनी नोंदविले.
महापालिका निवडणुकांचा आढावा घेत आठवले म्हणाले, महापालिका निवडणूक सोडत झाली आहे. 23 वॉर्ड शेडय़ुल कास्टसाठी सोडण्यात आले आहेत. रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार आहे. राज्यसभेची सहावी जागा आम्ही निवडून आणू. भाजपचा उमेदवार तेवढी मते मिळवण्यात यशस्वी ठरेल, असा दावा करतानाच आपण संविधानाचे पालन करत शांततेचा मार्ग स्वीकारायला हवा. धर्माच्या नावावर नवनवीन वाद काढू नयेत. शांततापूर्ण समाज निर्माण व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.