इब्रामपूर येथील दलित बांधवांचा आरोप : सरकारने दखल घेऊन न्याय द्यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढणार
पेडणे : इब्रामपूर दलित बांधवांची लोकवस्ती असलेल्या दहा हजार आठशे चौरस मीटर जमिनीतील सागवान व अन्य झाडे स्थानिकांना कुळांना विश्वासात न घेता त्यातील सागवान, फणस, आंबे आदी झाडे देवस्थान समिती आणि कोमुनिदाद यांनी कापून टाकून आमच्यावर अन्याय केलेला आहे. हा अन्याय सरकारने दूर करावा, अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानी पणजी येथे विविध संघटनांतर्फे मोर्चा काढण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. दरम्यान, वन खात्यासहृ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रवीण आर्लेकर, मुख्य सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी पेडणे यांना निवेदन दिले आहे. सरकारने न्याय न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पणजी येथे राज्यातील विविध संघटनांतर्फे मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. इब्रामपूर सरपंच अशोक धावस्कर उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात. यावेळी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे सखाराम कोरगावकर, युग नायकचे सुदन पेडणेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनसेवा समितीचे दिवाकर कोरगावकर, शाहू प्रतिष्ठानचे अनिल इब्रामपूरकर, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक संघटनेचे तुकाराम तांबोसकर, जॉगिंग स्पोर्ट्स अँड कल्चरलचे कृष्णा कोरगावकर, आरपीआयचे सतीश कोरगावकर आदींनी पाठिंबा यावेळी दिला.
इब्रामपूर येथील कोमुनिदाद प्रशासन आणि देवस्थान समितीने दलित बांधवांच्या जमिनीतील झाडे बेकायदा कापल्याचा आरोप केला. आम्हाला न्याय न मिळाल्यास न्यायालयाची दरवाजे ठोठावण्याचा असाही इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. इब्रामपूर येथील दलित वस्तीमध्ये एकूण 14 स्थानिकांची घरे पूर्वजांपासून आहेत, दहा हजार आठशे चौरस मीटर जमीन ही आमचीच आहे. ही जमीन आम्हाला कुठल्या देवस्थान किंवा कोमुनिदादंनी दिलेली नाही. परंतु काही कालांतराने हीच जमीन परस्पर कोमुनिदाद म्हणून नोंद करण्यात आली. त्यानंतर आमच्यावर अन्याय सुरू केला. हा अन्याय आता आम्ही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. इब्रामपूर येथील दलित वस्तीतील एकूण शेकडो मौल्यवान अशी झाडे कापण्यात आल्याची तक्रार दि 6 जून रोजी कोमनिदात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दिली होती. त्यानंतर त्यांनी संबंधितांना काम बंद करण्याचे आणि कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. परंतु त्यानंतर प्रशासकीय कोमुनिदाद अधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी पंधरा रोजी दिलेली आपलीच ऑर्डर मागे घेतली आणि 21 रोजी दलित बांधवांना चर्चेसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोलावले होते. नागरिक त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालयात गेले. परंतु प्रशासकीय अधिकारी त्यादिवशी गायब झाला. आमच्यावर झालेला अन्याय स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या कानावर आम्ही घातलेला आहे. आमचे ते नेते आहेत. आणि ते आम्हाला सरकारमार्फत योग्य तो न्याय देईल, असा विश्वास यावेळी दलित बांधवांनी व्यक्त केला.
…प्रसंगी सरपंचपदाचीही परवा नाही!
दलित बांधवांची घर पूर्वजांपासून आहेत. ती जमीन त्यांचीच आहे. पूर्वी ज्या दलित बांधवांनी देवस्थानची देवाची सेवा केली सेवेकरी म्हणून त्यांनी आपले काम सुरूच ठेवलं होते. परंतु काही महाजनाने त्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि आता झाडे कापून त्यांच्यावर केलेला आहे. सरपंचपदाच्या खुर्चीची आपल्याला हाव नाही. बांधवांवरील अन्यायसाठी खुर्ची सोडावी लागलीतरी परवा नाही, असा इशारा सरपंच अशोक धावसकर यांनी दिली. इब्रामपूर येथील दलितबांधवांवर झालेला अन्याय गोवा सरकारने दूर करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा, अशी मागणी चंद्रकांत जाधव, सतीश कोरगावकर, पांडुरंग हरिजन यांनी केली.
कैफियत मांडताना महिलेला अश्रू अनावर
दलित महिला प्रभावती परवार यांना आपली कैफियत मांडताना आश्रू अनावर झाले. आमच्या पूर्वजांनी ही झाडे लावली झाडांमधून आम्हाला उत्पन्न मिळायचं ते उत्पन्नच आता कुणीतरी हिरावून घेण्यासाठी आमच्यावर अन्याय करत आहे. आमच्या मुलाबाळांना आमच्या जमिनी आणि आम्ही लावलेली झाडे राखून ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत .परंतु आमची झाडे आम्हाला विश्वासात न घेता झपाझप कापली भविष्यात आमची घरेही हे मोडून टाकतील अशी भीती यावेळी या महिलेने रडत रडत व्यक्त केली.









