भाजप ओबीसी आघाडीची तक्रार : सरकारला निवेदन
बेळगाव : राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून मागासवर्गीयांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. औद्योगिक, कृषी, शिक्षणासाठी महामंडळांना अनुदान मंजूर केले नाही. त्यामुळे मागासवर्गीयांवर घोर अन्याय होतो आहे, असा आरोप भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीने (मोर्चा) केला आहे. ओबीसी आघाडीच्या सदस्य व कार्यकर्त्यांनी शुक्रवार दि. 13 रोजी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राज्य सरकारच्या नावे निवेदन दिले. अल्पसंख्याक, मागासवर्गीय, दलितांचे कल्याण करणारा पक्ष म्हणून काँग्रेस सरकार नेहमी सांगत असते. या जनतेच्या मतांवरच सत्तेवर आलेल्या काँग्रेसने आता या जनतेकडे दुर्लक्ष केले आहे.
राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी 1 हजार कोटीहून अधिक अनुदानाची तरतूद केली होती. डी. देवराज अर्स, वक्कलिग, मराठा, विश्वकर्मा, वीरशैव लिंगायत, निजशरण अंबीगर चौडय्या, नाभिक समाज, भटके, भटवे-विमुक्त, मडिवाळ, काडूगोल जमातीच्या विकासासाठी भाजप सरकारने महामंडळांना भरीव अनुदान दिले होते. त्यानंतरच्या काळात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने 1600 कोटी रुपयांची घोषणा अर्थसंकल्पात करून केवळ 57.04 टक्के रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे मागासवर्गीयांवर घोर अन्याय झाला आहे. काँग्रेस सरकारच्या या बेजबाबदारपणाचा भाजप ओबीसी आघाडी निषेध करीत असल्याचे सदस्य लक्ष्मण तपसी म्हणाले. करूणाकर खासले, मल्लिकार्जुन मादम्मन्नवर, संदीप देशपांडे, धनश्री देसाई, इरण्णा अंगडी, संतोष हडपद, रेखा चिन्नाकटी, सचिन कडी, यल्लेश कोलकार, संतोष देशनूर आदी मोर्चात सहभागी झाले होते.









