वृत्तसंस्था/ नवी दिल्ली,
वेस्ट इंडिजचा स्टार वेगवान गोलंदाज शमार जोसेफ शुक्रवारी दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी ऑलराउंडर जोहान लेनला संघात सामील करण्यात आले आहे.
दोन सामन्यांची कसोटी मालिका 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये सुरू होणार आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जोहान लेनने शमार जोसेफची जागा घेतली आहे, असे विंडीज क्रिकेटने एक्सवर जाहीर केले. 26 वर्षीय जोसेफच्या दुखापतीची माहिती बोर्डाने उघड केलेली नाही. परंतु 18 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या व्हाईटबॉल मालिकेपूर्वी त्याचे पुनर्मूल्यांकन केले जाईल, असे त्यात म्हटले आहे. गेल्या वर्षी पदार्पण केल्यापासून गयानीज स्पीडस्टरने खेळलेल्या 11 कसोटी सामन्यांमध्ये 51 बळी घेतले आहेत, त्याची सरासरी 21.66 आहे आणि त्याचा इकॉनॉमी रेट 3 पेक्षा थोडा जास्त आहे. बार्बाडोसचा रहिवासी असलेला 22 वर्षीय लेन हा सीम बॉलिंग अष्टपैलू आहे. त्याने 19 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 495 धावा केल्या आहेत तर 22.28 च्या सरासरीने 66 बळी घेतले आहेत, त्यात चार वेळा पाच बळी घेतले आहेत.









