वृत्तसंस्था/ ऍडलेड
भारताविरुद्ध गुरुवारी होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य लढतीत इंग्लंडचा प्रमुख फलंदाज डेव्हिड मलान खेळण्याची शक्यता कमी आहे. जखमी असल्याने या सामन्यातील त्याच्या सहभागाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
लंकेविरुद्ध झालेल्या सुपर 12 फेरीतील शेवटच्या सामन्यावेळी मलानला धोंडशिरेची दुखापत झाली. इंग्लंडने तो सामना 4 गडय़ांनी जिंकून उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित केले. टी-20 मधील माजी अग्रमानांकित फलंदाज असलेला मलान लंकेची फलंदाजी सुरू असताना लंगडत मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर तो फलंदाजीसही आला नव्हता. त्याची दुखापत गंभीर नसावी, असे उपकर्णधार मोईन अली म्हणाला. ‘तो आमचा प्रमुख खेळाडू असून अनेक वर्षे त्याने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. तो आमचा एक सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याच्या दुखापतीचे स्वरूप मला निश्चित माहित नाही. पण ती फारशी गंभीर नसेल, असे मला वाटते,’ असे तो म्हणाला.
‘भारताविरुद्ध जगात कुठेही खेळणे नेहमीच भारी वाटते. कारण तो एक बडा संघ असून गर्दी खेचणारा आणि क्रिकेट जगतातील बलवान संघ आहे,’ असेही तो भारताविरुद्धच्या लढतीविषयी बोलताना म्हणाला. इंग्लंड संघात फिल सॉल्ट हा एकमेव जादा फलंदाज असून त्यालाच मलानच्या जागी संधी दिली जाणार आहे.









