सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
उद्यमबाग पोलिसांच्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या युवकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंगळवार दि. 25 जुलै रोजी रात्री उद्यमबाग येथील एका हॉटेलसमोर त्याला मारहाण झाली होती. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
निरंजन चौगुले (वय 28) रा. भाग्यनगर असे त्या तरुणाचे नाव असून तो दिव्यांग आहे. दोन दिवस घरी विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी त्याने स्वत:हून सिव्हिल हॉस्पिटल गाठले. त्याच्या अंगावर मारहाणीचे व्रण उठले आहेत. सध्या त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. 1 मिनिट 26 सेकंदांच्या व्हिडिओत मारहाणीची दृश्ये कैद झाली आहेत. रात्री आपण जेवण पार्सल आणण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी पोलिसांनी आपल्यावर विनाकारण हल्ला केल्याचे जखमी युवकाने सांगितले.
या तरुणाला नेमक्या कोणत्या कारणासाठी मारहाण झाली, याचा उलगडा झाला नाही. यासंबंधी एसीपींकडून अहवाल मागविण्यात आला आहे. वस्तुस्थिती सामोरी आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.









