कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
कोल्हापूरातून सुरु असलेल्या विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर-मुंबई विमान रोजच फुल्ल असते. यामुळे या मार्गावर सकाळच्या सत्रात इंडिगो एअरलाईन्सकडून विमानसेवा सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. तसेच नवी मुंबई आणि दिल्लीसाठीही थेट विमानसेवा सुरु करण्यासाठी चाचपणी सुरु आहे.
कोल्हापूर विमानतळावरुन मुंबई, अहमदाबाद, तिरुपती, हैदराबाद या मार्गावर विमानसेवा सुरु आहे. मुंबईसाठी स्टार एअरचे रोज उडाण होते. तर तिरुपती, अहमदाबाद आणि हैदराबादसाठी आठवडयातून काही दिवस विमानसेवा सुरु आहे. या सर्वच मार्गावर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. नवीन टर्मिनल इमारत झाल्यापासून गेल्या वर्षभरात 8 लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी कोल्हापूर विमानतळावरुन प्रवास केला आहे. नाईट लँडिंगची सुविधा झाल्यापासून तर रात्रीच्या उडाणामध्ये वाढ झाली आहे. खासगी विमानांची संख्या वाढली आहे.सांगली, रत्नागिरी, सातारा येथे जाण्यासाठी व्हीआयपी कोल्हापूर विमानतळाचा वापर करत आहेत.
सर्वाधिक गर्दी कोल्हापूर- मुंबईसाठी आहे. या मार्गावर पाच हजारापासून पुढे तिकिट दर सुरु होतो असे एका नियमित प्रवाशांनी सांगितले. कोल्हापूर- मुंबई मार्गावरील विमानाला होणाऱ्या गर्दीमुळे या मार्गावर सकाळच्या सत्रात आणखी विमान सुरु करण्याची मागणी विमान प्रवाशांतून सातत्याने पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. सकाळी मुंबईत पोहोचून दिवसभरात काम आटोपून परत कोल्हापूरात येण्यासाठी सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरु होऊ शकते. इंडिगो एअरलाईन्सकडून ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. तर नवी मुंबई आणि दिल्लीसाठीही थेट विमानसेवा सुरु करण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. मुंबई,दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरु झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
- नाशिक, शिर्डीसाठीही चाचपणी
कोल्हापूर विमानतळाचा विकास होत आहे. विमानप्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. तसेच कोल्हापूर विमानतळाची अन्य मोठया शहरांशी कनेक्टीव्हीटी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये सद्या नाशिक आणि शिर्डी या दोन शहरांचा समावेश आहे. नाशिक आणि शिर्डीसाठी चाचपणी सुरु आहे.
इंडिगो एअरलाईन्समार्फत भविष्यात मुंबई, नवी मुंबई, शिर्डी किंवा नाशिक तसेच दिल्लीसाठी थेट विमानसेवा करण्याची चाचपणी सुरु आहे. कोल्हापूरमधील हवाई यात्रेकरुंची क्षमता पाहता भविष्यात अधिकाधिक शहरांना जोडण्याची शिफारस विमानतळ प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
-अनिलकुमार शिंदे, कोल्हापूर,विमानतळ संचालक
- दिल्लीत आज बैठक
मुंबई, दिल्लीसाठी थेट विमानसेवा आणि कोल्हापूर विमानतळाच्या इतर प्रश्नासंदर्भात आज (दि 6) दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे,विमानतळ संचालक अनिलकुमार शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत.








