वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीपासून ते गावच्या पूर्वदिशेला असलेल्या किगदी तलावापर्यंतच्या नाला सफाई कामाचा शुभारंभ शनिवारी पार पडला.
नाला सफाईचे काम हिंडाल्को कंपनीच्या सहकार्याने होत असून, पावसाळ्यापूर्वी नाल्याचे काम होत असल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
किगदी तलावापासून मार्कंडेय नदीपर्यंत गेलेल्या या नाल्यामध्ये विषारी वेल, झुडपे व गाळ पडला आहे. सदर नाल्यातून किगदी तलावाच्या अतिरिक्त पाण्याबरोबर नेहरुनगर, आझमनगर, शाहूनगर, बेळगाव महानगरपालिकेच्या उपनगरांचे सांडपाणी वाहात असते. नाल्यामध्ये गाळ पडल्यामुळे व झाडे-झुडुपे वाढल्यामुळे सांडपाणी वाहण्यात व्यत्यय येत आहे. परिणामी पावसाळ्यामध्ये नाला भरून शिवारात पसरत आहे. त्यामुळे शेताचे बांध फुटूनही नुकसान होत आहे. ते नुकसान टाळण्यासाठी हिंडाल्को कंपनी प्रत्येक वर्षी नाला सफाई करून देण्याचे काम करत आहे. यावर्षीही शनिवारपासून नाला सफाईच्या कामाला सुरुवा केल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हिंडाल्को कपंनीचे नेहमीच सहकार्य
नाला सफाई करण्यासाठी हिंडाल्को कंपनी प्रत्येक वर्षी सहकार्य करत असते. यावेळी हिंडाल्को कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विश्वास शिंदे, मयूर कृष्णा महेश शेट्टी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रा. पं. कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी प्रास्ताविक करून हिंडाल्को कंपनीचे आभार मानले.
यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, सदस्या भारता पाटील, वेदिका पठाणे, वंदना चव्हाण, सुचिता कोळी, मेनका कोरडे आदींच्या हस्ते जेसीबी मशीनचे पूजन केले. विश्वास शिंदे यांनी श्रीफळ वाढवून नाला सफाई कामाला प्रारंभ केला.
याप्रसंगी ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील, जयराम पाटील, प्रदीप पाटील, दादासाहेब भदरगडे, तानाजी पाटील, सुरेश राठोड, नवनाथ पुजारी, उमेश पाटील, बाळू दोडमनी, शेतकरी, मनोहर भेकणे, शंकर पाटील, शंकर ना. पाटील, शंकर कोलते, नागेश पाटील, गोपाळ पाटीलसह शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन यल्लाप्पा पाटील यांनी केले. प्रशांत पवार यांनी आभार मानले.









