वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ग्रँडमास्टर इनियन पन्नीरसेल्वमने मलेशियात झालेल्या नवव्या जोहोर इंटरनॅशनल खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
तामिळनाडूच्या या 22 वर्षीय खेळाडूने 9 डावांत 8.5 गुण घेत स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा त्याने 1.5 गुण जास्त घेऊन जेतेपद मिळविताना चार आंतरराष्ट्रीय मास्टर्स व एका ग्रँडमास्टरचा पराभव केला. 9 फेऱ्यांच्या या स्पर्धेत 8 देशांतील एकूण 84 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी 24 खेळाडूंनी जेतेपदे पटकावलेली होती.
आठव्या फेरीत पन्नीरसेल्वमने इंडोनेशियाच्या नायका बुधीधर्माचा पराभव केल्यानंतरच जेतेपद निश्चित केले होते. याशिवाय त्याने व्हिएतनामचा जीएम एन्ग्युएन व्हा हुइचा शेवटच्या डावांत पराभव केला. भारताचा आयएम व्हीएस राहुल व चीनचा आयएम लि बो यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळविले. इनियनने याच महिन्यात चेन्नई ओपन स्पर्धेत जेतेपद मिळविले हेत. त्याला जोहोरमधील जेतेपदानंतर 15 रेटिंग गुण मिळाले.









