स्थानिक रोजगार निर्मितीला पोषक वातावरण; आणखी दोन कंपन्यांचा उद्योगासाठी प्रस्ताव; लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास बळ मिळणार
गडहिंग्लज रोहित ताशिलदार
पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असणारे गडहिंग्लज शहर. गडहिंग्लज शहरालगतच असणाऱ्या एमआयडीसीत गेल्या चार वर्षात अनेक पायाभूत सुविधा भक्कम झाल्या असून नव्या उद्योगांना जणू ‘रेड कार्पेट’ घातल्याचे चित्र समोर येत आहे. पायाभूत सेवा, सुविधामध्ये रस्ते, वीज आणि मुबलक पाणी उपलब्ध करून दिल्याने स्थानिक रोजगारसह व्यापाराला आणखी चालना मिळणार आहे. या भरभक्कम पायाभूत सेवा, सुविधा उपलब्ध झाल्याने उद्योग क्षेत्राला चांगले पोषक वातावरण तयार झाले असून गडहिंग्लज एमआयडीसीला ‘अच्छे दिन’ येणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता मोठ्या उद्योगांची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे.
गडहिंग्लज शहरापासून 7-8 किलोमीटर अंतरावर दक्षिणेस बड्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जागा उपलब्ध आहे. सध्या या जागेत शैक्षणिक संस्था, दूधसंस्था आणि हॉस्पिटल वगळता जवळपास 10 लहान-मोठ्या औद्योगिक कंपन्या येथे कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्हयात एकमेव गडहिंग्लज एमआयडीसीमध्ये जागा शिल्लक असल्याने अनेक नामवंत कंपन्यानी याठिकाणी पसंती दिली आहे. याबाबत राज्यातील काही नामवंत कंपनीने जागा मिळण्यासाठी अर्ज केला असून या मागणीला महामंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते, स्ट्रील लाईट, विद्युत पुरवठा आणि मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने नव्या उद्योजकांना पोषक वातावरण तयार झाले आहे.
गडहिंग्लज, निपाणी, संकेश्वर, चिक्कोडी भागातून तयार होणारे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी नोकरीसाठी बाहेर जात आहेत. त्याच विद्यार्थ्यांना आपल्या गावानजीक काम मिळेत असेल तर सोन्याहून पिवळे अशी परिस्थिती निर्माण होईल. फक्त यासाठी अंतर्गत पायाभूत सेवा-सुविधा असून चालणार नाही तर बाहेरून येणाऱ्या कंपन्यांना कच्चा अथवा उत्पादीत केलेला माल सुरक्षित ने-आण करण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज आहे. सध्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने दळणवळणाचा भक्कम आधार आहे.
गडहिंग्लज एमआयडीमध्ये कंपन्याना बोअरवलेचे पाणी वापरले जात आहे. अशात महामंडळाचे उपअभियंता अजयकुमार रानगे यांनी भविष्यातील गरज आणि उद्योजकांचा विचार करत कर्तव्यनिष्ठ काम केल्याचे उदाहरण समोर आले आहे. पाटबंधारे विभागाच्या मदतीने शेंद्री तलावाच्या नजीकच विहीर खोदून पाणी उपलब्ध करून दिले आहेत. कमी वेळेत 25 लाखा निधी महामंडळाकडून उपलब्ध करून हे काम केले आहे. याची प्रचिती आता सध्या येत आहे. मान्सून पाऊस लांबल्याने या विहिरीच्या पाण्याचे पुरपूरे वापर होत आहे. सध्या या विहीरीत मोठा पाणीसाठा शिल्लक असून उपअभियंता रानगे यांनी उद्योजकांच्या हितासाठी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे दिसते. या पायाभूत सेवा, सुविधेमुळे नवे उद्योग सध्या पोषक वातावरण तयार झाले असून भविष्यात या ठिकाणी उद्योग सुरू झाल्यास स्थानिक तऊणांच्या हाताला काम मिळणार आहे. यामुळे गडहिंग्लज एमआयडीसीत नवनवीन उद्योग आता येतील असा विश्वास व्यक्त होत आहे.
संकेश्वर-बांदा महामार्गामुळे फायदा होणार ?
सध्या गडहिंग्लज शहरापासून नव्या संकेश्वर-बांदा मार्गाचे कामकाज सुरू आहे. रस्ता मोठा असल्याने अवजड वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता अधिक आहे. याचा फायदा एमआयडीला होणार असल्याची चर्चा देखील आता सुरू झाली आहे. नवीन उद्योगांना उत्पादीत केलेला माल कमी वेळेत बाहेर पाठवण्यासाठी आणि कच्चा माल आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
कोल्हापूर जिह्यात गडहिंग्लज एमआयडीसीचा विकास फार झपाट्याने होत आहे. औद्योगिक महामंडळाकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून नवीन उद्योजकांना या एमआयडीसीला पोषक वातावरण तयार झाले आहे. अजून तीन-चार कंपन्याचे प्रस्ताव आले आहेत. याला महामंडळाकडून सत्कारात्मक प्रतिसाद दिला असून या नव्या कंपन्याचे आगमन झाल्यास महामंडळाला महसूल, स्थानिकांना रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
अजयकुमार रानगे- उपअभियंता औद्योगिक महामंडळ, गडहिंग्लज
औद्योगिक महामंडळाने विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून एमआयडीसीचे रूप पालटले आहे. यामुळे नव्या उद्योजकांना चांगले वातावरण तयार झाल्याचे दिसून येते. एमआयडीसी विकसीत झाल्याने स्थानिकांना रोजगार आणि आर्थिक विकास होण्यास मदत होणार असून अनेक वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे दिसते.
सुनिल चौगुले, उद्योजक