वृत्तसंस्था /बेंगळूर
आयटी क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी इन्फोसिस लिमिटेड यांनी आपला दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून नफ्यात 3 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. वर्षाच्या आधारावर ही वाढ नोंदवत कंपनीने सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत 6212 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत पाहता हाच नफा 6026 कोटी रुपये इतका होता. याआधीच्या अंदाजात सदरची आयटी कंपनी 2 ते 6 टक्के यादरम्यान नफा कमावू शकते, असे व्यक्त करण्यात आले होते. त्याप्रमाणे कंपनीने आपला नफा नोंदवला असून प्रति समभाग 18 रुपये अंतरीम लाभांश देण्याच्या प्रस्तावाला संचालक मंजुरी दिली आहे. कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीत 38,994 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला असून मागच्या वर्षीच्या तुलनेत (36,538 कोटी रुपये) 6 टक्के इतका अधिक आहे.
काय म्हणाले सीईओ
आयटी कंपनी इन्फोसिसचे सीईओ व एमडी सलील पारेख म्हणाले की, दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 7.7 अब्ज डॉलर्सचा मोठा व्यवहार केला आहे. अस्थिरतेचे वातावरण असताना कंपनीने ही कामगिरी केली आहे. ग्राहकांच्या गरजा अत्युच्च पातळीवर पूर्ण करण्यासाठी कंपनी सज्ज असून उत्पादनावर लक्ष देतानाच खर्चात बचतीचा मार्ग आगामी काळात अवलंबला जाणार आहे.
टीसीएसला 11342 कोटीचा नफा
आयटी क्षेत्रातील आणखी एक दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनीही आपला सप्टेंबरअखेरचा तिमाही निकाल घोषित केला असून 11342 कोटी रुपयांचा निव्वळ नफा सदरच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने नोंदला आहे. याआधीच्या म्हणजेच मागच्या वर्षी कंपनीने 10,431 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. 9 रुपये प्रति समभाग लाभांश कंपनीने जाहीर केला आहे. याच अवधीत 59,692 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केलाय, जो मागच्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्के अधिक आहे.









