एप्रिल-जून 2023 तिमाहीतील कामगिरी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसने गुरुवारी आपला जूनअखेरचा तिमाही निकाल जाहीर केला असून नफ्यामध्ये कंपनीने 11 टक्के वाढ नोंदवली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत इन्फोसिसने 5945 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. या आधीच्या वर्षामध्ये समान अवधीत इन्फोसिस 5362 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. कंपनीचा हा नफा तज्ञांच्या अंदाजानुसार तसा कमीच दिसून आला आहे. तज्ञांनी इन्फोसिसला 6193 कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज वर्तवला होता.
महसूलातही वाढ
कंपनीने याच तिमाहीमध्ये वर्षाच्या आधारावर 10 टक्के वाढीसह 37933 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल प्राप्त केला आहे. सदरचा महसूल हा मागच्या तिमाहीपेक्षा 21 टक्के कमीच नोंदला आहे. सदरच्या आयटी कंपनीने आर्थिक वर्ष 2024 साठी आपल्या महसुलाच्या अंदाजामध्ये 1 ते 3.5 टक्के घट व्यक्त केली आहे. कंपनीने जून तिमाहीमध्ये कंत्राट कराराच्या माध्यमातून 2.3 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. याआधीच्या वर्षात याच कालावधीत ही कमाई 2.1 अब्ज डॉलर्सची होती. कंपनीला अलीकडेच दोन महत्त्वाच्या कामांची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
2 अब्ज डॉलर्स खर्चाची योजना
यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन संदर्भात आधुनिकीकरण व विकासासाठी 2 अब्ज डॉलर्सचा खर्च करण्याची तयारी कंपनीने केली आहे. हा खर्च पुढील पाच वर्षांत केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. इन्फोसिसने आपल्या तिमाही नफ्याचे निकाल शेअर बाजार बंद झाल्यानंतर जाहीर केला आहे.









